बेळगाव : मराठी भाषिकांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ हा फलक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता हटविण्यात आला. फलक हटविल्यामुळे येळ्ळूर गावात तणावपूर्ण शांतता असून, संपूर्ण सीमाभागातील जनतेतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आज, शुक्रवारी सकाळी येळ्ळूर येथील फलाकासमोर पोलिसांच्या दोन गाड्या उभ्या होत्या. साडेदहा वाजता वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर शेकडो पोलीस व अधिकारी जमले. पावणेअकरा वाजता येळ्ळूरची सीमा सील केली. येळ्ळूरमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. प्रांताधिकारी शशिधर बगली यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक हटविणार असल्याचे सांगितले. यावेळी मराठी भाषिकांनी घोषणाबाजी केली. फलकावरील मागणीप्रमाणे भगवा ध्वज दोन युवकांच्या ताब्यात देण्यात आला. नंतर फलकावर हातोडा पडला. अर्ध्या तासात फलक जमीनदोस्त केला.
‘महाराष्ट्र राज्य-येळ्ळूर’ फलक हटविला
By admin | Published: July 26, 2014 12:42 AM