कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आवडते शहर आणि आजोळदेखील कोल्हापूर आहे. बहिण, मेव्हणी, पुतणी असे अनेकजण थेट नात्यातील लोक कोल्हापूरला राहतात, त्यांची असंख्य टोलेजंग निवासस्थाने आहेत, मात्र पवार कधीच पाहुणचारासाठी त्यांच्या घरी मुक्काम करीत नाहीत. बसस्थानकाजवळील पंचशील या शुध्द शाहाकारी हाँटेलच्या पाचव्या मजल्यावरील ४०२ क्रमांकाच्या खोलीतच उतरतात. त्याच खोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम ठोकल्याने चर्चेला उधाण आले आहे.शरद पवार यांच्याशिवाय हॉटेलच्या या खोलीत शक्यतो कोणी उतरत नाही. पण सोमवारी महाजनादेश यात्रेनिमित्त कोल्हापूर मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच पंचशील हॉटेलवर उतरले, तेव्हा अख्या कोल्हापूरात चर्चा सुरू झाली. पवार आणि हॉटेलचे मालक कांतीलाल चोरडिया यांची मैत्री असल्याने ते तेथे उतरतात. हे हॉटेल शाकाहारी आणि पवार यांना कोल्हापूरचा तांबडा-पांढरा आहार खूप आवडतो. कोल्हापूरातील दिवसभरातील कार्यक्रमात बोलताना एकादा तरी विनोद पांढरा -तांबड्यावरून करतातच. मुक्काम जरी पंचशीलवर असला तरी पवार खास मांसाहार बनविणाऱ्या मित्रांकडे जाणारच; पण मुक्काम ४०२ मध्येच करणार! मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह सुसज्ज करून ठेवलेले असताना त्यांनी याच हॉटेलवर आणि त्यातही खोली नंबर ४०२ मध्ये मुक्काम ठोकला. फडणवीसांनी नेमकी हीच खोली का निवडली?अशी चर्चा आता सुरू आहे.
Vidhan Sabha 2019 : पवारांच्या खोलीत फडणवीसांचा मुक्काम !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:10 AM