कोल्हापूर : प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्यायाला विरोध म्हणून स्थापन झालेल्या वंचित आघाडीने उमेदवारी देताना मात्र प्रस्थापितांनाच जवळ केल्याचे दिसत आहे. चंदगडमधून अप्पी पाटील व राधानगरीतून जीवन पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवारी देऊन हे सिद्ध केले आहे. याशिवाय कागलमध्ये भाजपचे सदस्य आणि बंडखोरी करून अपक्ष उमेदवार असलेले समरजितसिंह घाटगे यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे.सत्तेपासून वंचित राहिलेल्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. लोकसभेला प्रस्थापितांचे पारंपरिक गणित चुकविण्यात यश आल्याने विधानसभेला भूमिकेला महत्त्व आले. कोल्हापुरात आल्यानंतर आंबेडकर यांनी वंचित कदापिही प्रस्थापितांना जवळ करणार नाही, आम्ही तत्त्वांचे राजकारण करतो, असे जाहीरपणे सांगितले होते.
दक्षिण आणि करवीरमधून दिलीप कावडे व आनंद गुरव यांच्या रूपाने वंचित लोकांना उमेदवारी देऊन या उद्देशाची सुरुवात केली; पण दुसऱ्या यादीपासून वंचितचा मूळचा उद्देश बाजूला पडत गेला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आणि भाजप-शिवसेना युतीतून ज्यांना नाकारले गेले, त्यांनाच वंचितची उमेदवारी घेण्यासाठी गळ घालण्यात येऊ लागली.
यातूनच सुरुवातीला प्रकाश आवाडे, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, दौलत देसाई, राजीव आवळे यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आग्रह धरला गेला; पण या सहाजणांनीही सावध भूमिका घेतल्याने वंचितला अन्य चेहरे देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यातून शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, शाहूवाडी, कोल्हापूर उत्तरला नव्या चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर केली.चंदगडमधून अप्पी पाटील, राधानगरीतून जीवन पाटील यांची उमेदवारी निश्चित केली. पाटील हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. अप्पी पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. कागलमधून समरजितसिंह घाटगे यांना शाहूंचे वंशज म्हणून पाठिंबा जाहीर केला आहे. घाटगे हे भाजपचे सदस्य आहेत, त्यांनी म्हाडाचा राजीनामा दिला असला, तरी ते गेली पाच वर्षे सत्ताधाऱ्यांसोबतच होते. वंचितच्या प्रस्थापितविरोधी धोरणात या तीनही मतदारसंघातील भूमिका कशी काय बसते, अशी विचारणाच आता होऊ लागली आहे.वंचितचे उमेदवारराधानगरी : जीवन पाटील,करवीर : आनंद गुरव,उत्तर : राहुल राजहंस,शाहूवाडी : सुनील पाटील,हातकणंगले : शिवाजी कांबळे,इचलकरंजी : शशिकांत आमणे,शिरोळ : सुनील खोत,चंदगड : अप्पी पाटील