गडहिंग्लज :विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी व राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी प्रकृतीच्या कारणामुळे तर त्यांनी ‘आई’च्या भूमिकेतून दिलेल्या सल्यानुसार त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यादेखील यावेळी चंदगड विधानसभेची निवडणूक लढणार नाहीत. ‘कुपेकर-बाभूळकर’ या दोघी माय-लेकींनी आपला निर्णय येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.
आमदार कुपेकरांनी यावेळी स्वत: पुन्हा निवडणूक लढवावी किंवा तब्येतीमुळे त्यांना शक्य नसेल तर त्यांच्या कन्या बाभूळकर यांनी निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी चार दिवसापूर्वी मुंबई येथील भेटीत व्यक्त केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून कळवितो असे संध्यादेवींनी सांगितले होते. माय-लेकी दोघींनी थांबण्याचा निर्णय घेतल्याचे संध्यादेवींनीच आज स्पष्ट केले. परंतु, पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करत राहू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच त्यांनी रिंगणातून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले.
कुपेकर म्हणाल्या, पवारसाहेब व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच आपण निवडणूक लढविली. सत्तेत नसतानाही ५ वर्षात २०० कोटींची कामे केली. स्व. कुपेकर यांच्या स्वप्नातील विकासकामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपण समाधानी आहोत. स्वत:चे करिअर बाजूला ठेवून नंदाताईनी मोलाची साथ दिली, त्यांचे कामदेखील खूप चांगले आहे. परंतु, दूरवरचा विचार करूनच त्यांनीदेखील निवडणूक लढवू नये, असा सल्ला आपण त्यांना आई म्हणून दिला आहे.बाभूळकर म्हणाल्या, पवार आणि कुपेकर घराण्याचे नाते राजकारणाच्या पलिकडे आहे.पवारसाहेबांमुळेच सहावेळा आमदारकीची संधी कुपेकर घराण्याला मिळाली. आम्ही आहे तिथे समाधानी आहोत. कोणत्याही स्वार्थाशिवाय अत्यंत कठीण काळात आईच्या मागे उभे राहिली. पवार घराण्याचे प्रेम आणि विश्वास, जीवाभावाचे कार्यकर्ते व जनतेच्या प्रेमाच्या ऋणातच आपण सदैव राहू.प्रारंभी चंदगडविधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उदयराव जोशी यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग चव्हाण यांनी आभार मानले.बैठकीस गडहिंग्लज तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, अशोकराव देसाई, अल्बर्ट डिसोझा, एम. के. देसाई, संतोष पाटील-कडलगेकर, जयकुमार मुन्नोळी, शिवप्रसाद तेली, राकेश पाटील, बनश्री चौगुले, श्रीया कोणकेरी, वैशाली पाटील आदींचा गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.नंदाताईची गाडी अडवली..!
निवडणूक न लढविण्याचा कुपेकर माय-लेकींनी घेतलेल्या निर्णयामुळे उपस्थित सर्वच कार्यकर्ते अस्वस्थ झाले. ताई, आमच्यासाठी खूप कांही केलांत, आम्हाला सोडून जाता येणार नाही, आमच्यासाठी तुम्हाला लढावेच लागेल, असे म्हणत चंदगडच्या गणेश फाटक या युवक कार्यकर्त्याने चक्क गाडीसमोर आडवे पडून त्यांची गाडी अडवली.‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले
नंदाताईच्या भाजपा प्रवेशासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. परंतु, बदलत्या राजकीय परिस्थितीत ‘संध्यादेवी आणि नंदाताई दोघीही यावेळी निवडणूक लढविणार नाहीत’ असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवार (१८) च्या अंकात प्रसिद्ध केले होते. ते तंतोतंत खरे ठरल्याची चर्चा चंदगडसह जिल्हाभर आहे.