कोल्हापूर : ‘मोदी-फडणवीस की राहुलबाबा-शरद पवार यांच्यापैकी तुम्हांला कुणाची निवड करायची आहे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत नंबर १ चे राज्य करून दाखवू. आमच्या सरकारने कोल्हापूर टोलमुक्त केले. भ्रष्टाचार कमी केला. ऊस उत्पादकांना थेट अनुदान दिले. विमानसेवा सुरू केली. आता आयटी पार्क आणून विकास करू, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील विराट जाहीर सभेत केले.
ढगाळ हवामानामुळे विमानप्रवासात अडचणी आल्याने तब्बल दोन तास उशिराने येथील तपोवन मैदानावर रखरखत्या उन्हात ही सभा झाली.महापुरात कोल्हापूर-सांगलीचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करून ही दोन्ही शहरे आम्ही सुंदर बनवू, असे आश्वासनही शहा यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायांखालची वाळू घसरल्यामुळेच ते विचित्र हावभाव करीत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सभेत केली.शहा म्हणाले,विकासाची कामे काय होतील-राहतील; पण काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची हिंमत ५६ इंच छातीवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दाखविली. हे कलम रद्द झाल्यानंतरची देशातील ही पहिलीच निवडणूक असल्याने महायुतीला विजयी करून हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून द्या.कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक व महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर यांची भाषणे झाली. आमदार अमल महाडिक यांनी स्वागत केले.