Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:51 PM2024-10-28T23:51:18+5:302024-10-29T00:03:21+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरातील उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार बदलला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवार याद्या अजूनही जाहीर होत आहेत. काँग्रेसने आज पाचवी यादी जाहीर केली. या यादीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात आधी जाहीर केलेला उमेदवार काँग्रेसने आता बदलला आहे. याआधी काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. पण कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता पुन्हा उमेदवार बदलण्यात आला आहे. आता काँग्रेसने मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची घोषणा केली आहे.
काँग्रेसने दोन दिवसापूर्वी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात राजू लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात ट्विस्ट आला आहे. काँग्रेसचा उमेदवार बदलावा यासाठी नाराज नगरसेवकांनी मधुरिमाराजे यांची भेट घेत मनधरणी केली आहे. आज याबाबत वाड्यावर बैठक झाली. यानंतर आता काँग्रेसची नवीन यादी आली या यादीत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
नाराज कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. याबाबत आज बैठक झाली. महायुतीमध्येही कोल्हापूर उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन चर्चा सुरू होत्या. शिंदे गटाने काल माजी आमदार राजेश श्रीरसागर यांच्या नावाची घोषणा केली. पहिल्या यादीत महायुतीने उत्तरचा उमेदवार जाहीर केला नव्हता त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. आता उत्तर विधानसभेत शिंदे गटाच्या राजेश श्रीरसागर यांच्याविरोधात मधुरिमाराजे छत्रपती अशी लढत होणार आहे.
लाटकर समर्थकांचा उद्रेक
दिवसभरात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर रात्री उशिरा कावळा नाका परिसरात लाटकर समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. लाटकर समर्थकांनी घडलेल्या घटनेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. उद्या सकाळी शाहू महाराजांकडे याबाबत न्याय मागणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.