Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आहे. काँग्रेसने मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर केली. पण, ऐनवेळी मधुरिमाराजे यांनी अर्ज माघार घेतला. यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. याबाबत खासदार शाहू महाराज यांनी स्पष्टीकरण देत राजेश लाटकर या कार्यकर्त्यावर अन्याय नको म्हणून उमेदवारी माघार घेतल्याचे सांगितले. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहे. आज त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीला आमदार सतेज पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर येथील नवीन राजवाड्यावर मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे यांच्या उपस्थित सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सतेज पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी बोलताना मधुरिमाराजे म्हणाल्या, ही निवडणूक लढायची नाही हा आमचा निर्णय पहिल्यापासून होता. एकच पद घरात यासाठी निवडणूक लढायचे नाही. राजकारणात अशी काही परिस्थिती झाली त्यामुळे निवडणूक लढायचे ठरले. पण, एकाच उमेदवाराने लढायचं असं ठरले होते. रयतेसाठी आमच्या घराण्याने पहिल्यापासून काम केले आहे. आता आपण एकत्रित मिळून रहायचे आहे, एकत्रितच आता आपल्या पक्षाचे काम करायचे आहे, असंही मधुमरिमाराजे म्हणाले.
यावेळी मालोजीराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांना पहिल्यापासून सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी असं वाटतं होतं. पण कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या यामुळे आम्ही काँग्रेसकडून अर्ज भरला. अनेक घडामोडीनंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून राजेश लाटकर यांना आमदार करण्याची भावना शाहू महाराज यांनी व्यक्त केली होती, असंही मालोजीराजे म्हणाले. दरम्यान, आजपासून मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे यांनी राजेश लाटकर यांच्यासाठी उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे.
यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांनीही पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सतेज पाटील म्हणाले, खासदारकीच्या निवडणुकीचा आपण सर्वांनी अभ्यास करुया. मी जिल्ह्यात अनेक लोकांना भेटतो, अनेकजण सांगतात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत यायला पाहिजे. आपल्या जाहीरनाम्याचा अभ्यास केला पाहिजे, अशा सूचना पाटीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.