Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 07:09 PM2024-11-16T19:09:22+5:302024-11-16T19:10:49+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : 'महाराष्ट्रातील सरकार ज्या लोकांनी पैशाच्या जोरावर चोरले ती लोक संविधानाच्या गोष्टी करतात, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. प्रियांका गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या, त्यांनी महाविकास आघाडीची जाहीर सभा घेतली. यावेळी प्रियांका गांधी बोलत होत्या.
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
जाहीर सभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, काही दिवसापूर्वी पीएम मोदींनी राहुल गांधी, पंडित नेहरु आरक्षणाच्या विरोधात असल्याची टीका केली, पण देशात नेहरुंनीच आरक्षण लागू केले आहे, तसेच राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली, यावेळी त्यांनी जाती जनगननेची मागणी केली. तरीही तुम्ही म्हणता ते आरक्षणाविरोधात आहेत. महाराष्ट्रात जनतेने जे सरकार आणले ते सरकार तुम्ही करोडो रुपये देऊन चोरी केले आणि तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता, तुम्ही संविधान वाचवणार, असा टोलाही प्रियांका गांधी यांनी भाजपाला लगावला. तुम्ही भ्रष्टाचाराच्या गोष्टी करता, आमदार खरेदी करण्यासाठी कुठून आले एवढे करोडो रुपये, शंभर, शंभर कोटी रुपये कुठून आले. कोणाचे आहेत हे पैसे. महाराष्ट्रात तुम्ही सरकार खरेदी केले, असा आरोपही गांधी यांनी केला.
" संविधानाने तुम्हाला सरकार बनवण्याचा अधिकार दिला आहे. तुम्ही सरकार बनवता पण मोदींनी देशारत सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा सुरू केली आहे. आणि हीच लोक आरक्षण आणि भ्रष्टाचारवर बोलत आहेत. तुम्ही डोळे उघडा, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांची भाषण ऐकली की दुःख होतं. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. मोदी व्यासपीठावर येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीकाही प्रियांका गांधी यांनी केली.