Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : मुंबई - लाडकी बहीण योजनेवरून राजकारण पेटले आहे. महायुतीने जाहीर केलेले दर महिन्याचे १५०० रुपये आता जाहीरनाम्यात २१०० रुपये केले आहेत. तर महाविकास आघाडीने ते ३००० रुपये केले आहेत. फुकट वाटल्या जाणाऱ्या योजनांना विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात येऊन या योजनेची देशात चर्चा असल्याची स्तुती केली आहे. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धक्कादायक वक्तव्य येत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. दरम्यान, आता या विधानाबाबत निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचार संहिता १५ ऑक्टोंबर, २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य
लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. ''जर इथे काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे १५०० रुपये घेतात त्या महिला दिसल्या त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे नाही चालणार'', असे दम महाडिक यांनी भरला आहे. भर सभेमध्ये महाडिक यांचे हे वक्तव्य आलेले आहे.
अनेक ताया महाराष्ट्रात आहेत, छाती बडवत आहेत. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत? राजकारण करता पैशांचे? काँग्रेसच्या सभेला महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे. आम्ही व्यवस्था करतो त्यांची, अशी धमकी महाडिक यांनी दिली आहे.
जर मोठ्याने कोण भाषण करायला लागली, दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा आणि लगेच करतो बंद म्हणायचे पैसे. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. यावरून आता राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.