Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :कागल येथे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांची उपस्थिती होती. या सभेत सरोज पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली.
"कागलमध्ये सभेला मोठी गर्दी आहे, याचा अर्थ मुश्रीफ नक्की गाडला जाणार आहे. आता आमच्या पिढीचे वय झाले असले तरीही आम्ही ब्रिटीशांच्याविरोधात लढलेले आहोत त्यामुळे आमचे रक्त स्वाभिमानाचे आणि देशभक्तीचे आहे म्हणून आम्ही निराश होत नाही. पारतंत्र्यापेक्षाही आताचा काळ वाईट आहे, आमचे लोक आता यांच्या नादी लागले आहे. हे वाईट आहे, शरद पवार यांनी यांना काय दिले नाही. आधी खा खा खायचं मग दुसऱ्या पक्षात पळून जायचे, असा टोला सरोज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला.
सरोज पाटील म्हणाल्या, जयंत पाटील, शरद पवार यांना ईडी लागली का? ते स्वच्छ आहेत. मग खायचं एवढं आणि नंतर ईडीला घाबरुन पळून जायचं. बहुजन समाजातील मुलाला मराठी व्यवस्थित वाचता येत नाही आणि त्यांनी संस्कृत विषय दिला आहे. हे कसं चालणार. महिलांनो आपली मुल काय करतात बघा, त्या भिड्याच्या नादाला लागली आहेत का बघा. भिडे गुरुजी आणि त्यांची टोळकी तुमच्या मुलांना पेट्रोल देतील आणि काय देतील आणि गाड्या उडवा म्हणतील आणि मत घेतील त्यामुळे आपली मुल काय करतात बघा. त्या गटार गंगेत आपल्या मुलांना जाऊ देऊ नका, असंही सरोज पाटील म्हणाल्या.
अजित पवार यांच्यावरही टीका
"मी शरद पवार यांना लहानपणापासून पाहिलं आहे. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात तो अग्रभागी असायचा. आमचंच रक्त ज्यांच्यात आहे तो आमच्याच घरातील गडी ईडीच्या कारवाईला घाबरुन तिकडं गेला आहे. शरदने अजितला लहानाचा मोठा केला. तो अजित या वयात शरदला सोडून पळून गेला. म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून गेल्यासारखं दु:ख झालं. माझ्या भावाच्या अंगात धाडस आहे, या वयात पक्ष आणि चिन्ह काढून घेतले, असंही सरोज पाटील म्हणाल्या.