भीमगोंडा देसाई - कोल्हापूर कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही दहावी, बारावीसाठी पुरवणी परीक्षा घेण्यासाठी पाच वर्षांपूर्वी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने सविस्तर अभ्यास केला होता. मात्र, तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाचा अभाव, आदी कारणांमुळे पुरवणी परीक्षेचा निर्णय होऊन अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नापास झाले. अलीकडे तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने अशी परीक्षा घेणे शक्य असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांना महत्त्व आहे. त्यामुळे परीक्षा व निकाल वेळेवर लागावे, अशी विद्यार्थी, पालकांची अपेक्षा असते. निकाल जितका लांबणीवर, तितका अधिक काळ विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतो. करिअरची दिशा ठरविण्यासाठी विचार करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. कर्नाटकात महिन्यात निकाल लागल्याने करिअरची दिशा ठरविण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे येथील मंडळाने पुरवणी परीक्षा घेण्यासाठी सविस्तर अभ्यास केला.कर्नाटकात कशा पद्धतीने नियोजन केले जाते, त्याची माहिती घेतली. मात्र, महाराष्ट्रात पुरवणी परीक्षेची यंत्रणा राबविण्यात अडचणी दिसू लागल्या. शासनाच्या शिक्षण विभागानेही विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे निर्णय होऊ शकला नाही. मंडळाने दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेऐवजी दोन विषयांत नापास असला, तरी पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची मुभा दिली. त्यामध्ये अकरावी किंवा अन्य अभ्यासक्रमांची मुख्य परीक्षा देण्यापूर्वी नापास विषय सोडविणे बंधनकारक केले. यामुळे संबंधित विद्यार्थ्यास नापास असलेल्या दोन विषयांचा आणि पुढील वर्गातील विषयांचा अभ्यास करताना ताण पडतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी याचा फारसा फायदा झाला नाही. बारावीत नापास विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबरच पर्याय राहिला.अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचे शिक्षण संस्थांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक वर्ष वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दबाव वाढविल्यास पुढील शैक्षणिक वर्षात पुरवणी परीक्षेचा निर्णय होणे सहज शक्य आहे. विद्यार्थ्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर भाजप शासनाने तरी दहावी, अकरावी व बारावीसाठी पुरवणी परीक्षा घ्यावी, अशी मागणी आहे. कर्नाटकच्या धर्तीवर पुरवणी परीक्षा महाराष्ट्रात घेण्यासंबंधी मंडळाने पाच वर्षांपूर्वी अभ्यास केला होता. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रश्नपत्रिका विविध भाषेत भाषातंर करणे, परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा उभा करणे, अशा अडचणी समोर आल्या. त्यामुळे पुरवणी परीक्षेऐवजी दहावीत दोन विषयांत नापास असल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला.- उज्ज्वला पाटील, माजी अध्यक्षा, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळपुरवणी परीक्षा घ्यानापासांचे वर्ष वाचवा ३
‘पुरवणी’ परीक्षेत महाराष्ट्र नापास !
By admin | Published: March 26, 2015 12:32 AM