लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतिबिंब पडल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा वारू असाच वेगाने वाहिला होता. त्याला रोखण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा करून दाखविले. त्यामुळे ममतादीदींच्या विजयानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांची आठवण अनेकांना झाली.
या दोन्ही निकालांमध्ये काही गोष्टी साम्य असलेल्या आहेत. मुळात या दोन्ही प्रदेशांमध्येही साम्य आहे. सामाजिक प्रबोधनच्या चळवळी या भूमिमध्ये जास्त झाल्या. स्वातंत्र्य चळवळीतील या दोन्ही प्रदेशांचा सहभागही जास्त राहिला. या चळवळीत महाराष्ट्रासारख्याच किंबहुना जास्तच पश्चिम बंगालमध्ये सशस्त्र उठावाच्या चळवळी झाल्या आहेत. दोन्ही प्रांतातील वैचारिक साहित्य अव्वल दर्जाचे मानले जाते. संगीत-चित्रकला याबाबतही या राज्यांची वेगळी छाप आहे. दोन्ही प्रदेशामध्ये लोकांना स्वत:च्या मातीबद्दलचा प्रचंड अभिमान आहे. महाराष्ट्र १९६० च्या दशकानंतर औद्योगिक विकासात पुढारलेले राज्य बनले व बंगाल मात्र मागासलेला राहिला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सगळी यंत्रणा शरद पवार यांच्याविरोधात लावली. इडीपासून विविध चौकशी प्रकरणे मागे लावून त्यांना हैराण करून सोडले. राष्ट्रवादीतील अनेक नेते त्यांनी भाजपमध्ये घेतले. पवार यांची चोहोबाजूनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अगदी तसेच ममता बॅनर्जी यांच्याबाबतही घडले आहे. रोज एक नेता त्यांच्या पक्षातून फुटून भाजपमध्ये गेल्याचे चित्र दिसत होते. त्या एकट्याच पक्षात राहतात की काय, अशीही हेटाळणी त्यावेळी केली गेली. परंतु पवार असोत की ममतादीदी, त्यांनी या सगळ्याला तोंड दिले. सत्तेचा वापर करून एखाद्याची चोहोबाजूंनी कोंडी केली जाते, तेव्हा सामान्यत: सामान्य माणूस त्या व्यक्तीच्या मागे उभा राहतो. राष्ट्रवादीला टार्गेट केले नसते, त्यांच्या पक्षातील नेते फोडून घेतले नसते आणि ही निवडणूक झाली असती, तर लोकांनी राष्ट्रवादीला एवढे यश दिले नसते. भाजप सगळ्या ताकदीसह त्यांच्यामागे लागला असताना, हा ८० वर्षांचा म्हातारा त्याला तोंड देऊन लढतोय, असे चित्र वातावरण बदलून गेले. तसेच कांहीसे वातावरण पश्चिम बंगालमध्येही बनल्याचे निकालावरून दिसते. तिथे तर एका महिलेबद्दल प्रचारात ज्या पध्दतीची भाषा वापरली गेली, ते तेथील मतदारांना आवडले नसल्याचे दिसते. लढणाऱ्या नेतृत्वाला सामान्य माणूस नेहमीच बळ देत आला आहे, याचेही प्रत्यंतर या निकालाने आणून दिले. मतांचे धुव्रीकरण जरूर झाले, परंतु ते ममता बॅनर्जी ताकदीने उभ्या राहिल्या म्हणून.