लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत जागतिक महिला दिनापासून (८ मार्च) महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या अभियानाच्या काळात शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला बचतगटांना प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध करुन देणे, महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे, महिलांचे हिमोग्लोबिन व बीएमआय तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करणे, महिलांमधील तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीर मुक्ती, आदींबाबत जनजागृती करणे, महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे, आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
बचतगट, ग्रामसंघ आणि प्रभागसंघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करण्यात येतील. महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविण्यासाठी निधी आणि कर्ज उपलब्धतेसाठी मदत करण्यात येईल. महिला बचतगटांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडिंग व पॅकेजिंगवर काम करण्यात येईल. शासकीय कार्यालये आणि आवारामधील उपाहारगृहे बचतगटांना चालविण्यासाठी देणे, बचतगटांना उद्योग, आधार व अन्न परवाना मिळवून देणे, आदीसाठी प्रयत्न करण्यात येतील. महिलांना कौटुंबिक हिंसाचार व कायद्यांबाबत मार्गदर्शन करणे व कायदेविषयक मोफत साहाय्य व सल्ला देणे, अस्मिता योजनेंतर्गत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता आणि विक्रीस चालना देण्यात येईल. ग्रामपंचायत महिला सदस्यांना पंचायत राजविषयक प्रशिक्षणे देण्यात येतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगतिले,
उत्कृष्ट कामगिरीसाठी होणार गौरव
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे, तालुके, आदी विविध घटकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.