कोल्हापूर : शहरात रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये अर्धा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. आरोग्य विभागाने पाऊस असतानाही अभियानात खंड पडू दिला नाही.
ही स्वच्छता मोहीम बेलबाग, मंगेशकर नगर मेनरोड, पंचगंगा स्मशानभूमी परिसर, कसबा बावडा स्मशानभूमी परिसर, बापट कॅम्प स्मशानभूमी परिसर, कदमवाडी स्मशानभूमी परिसर येथे करण्यात आली.
स्वरा फाउंडेशनच्या वतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे स्वच्छता करून वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी वड, औदुंबर, करंजी, जांभूळ, गुलमोहर झाडे लावण्यात आली. यावेळी स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, शाखा अभियंता आर. के. पाटील, संभाजी मगदूम, सर्जेराव अलवेकर व सदस्य उपस्थित होते. अभियानामध्ये मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, स्वच्छता दूत अमित देशपांडे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.
विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, करण लाटवडे, महेश भोसले, सुशांत कावडे, मनोज लोट, शुभांगी पोवार उपस्थित होते.