लोकमत न्यूज नेटवर्क
खोची पेठ वडगाव : महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीतील कामगारांना सरासरी १० ते १२ टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय आमदार राजू आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूतगिरणी प्रशासनाने घेतला आहे. दिनांक १ एप्रिलपासून ही पगारवाढ लागू करण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट व आर्थिक मंदीतही पगारवाढीचा दिलेला शब्द पाळल्याबद्दल कामगारांनी आमदार आवळे यांचा सत्कार केला.
कोरोनाच्या स्थितीमुळे अनेक ठिकाणी कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. पगारात कपात झाली, त्यामुळे कामगारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत महात्मा फुले सूतगिरणीने मात्र पगारवाढ करून कामगारांना आशादायक संदेश दिला आहे.
कामगारांना पगारवाढ करण्याचा शब्द आमदार आवळे यांनी दिला होता. परंतु, कोरोनाच्या महासंकटात अनेक अडचणी निर्माण झाल्याने त्याला थोडा विलंब झाला. दरम्यान, गतवर्षातील मार्च, एप्रिल महिन्याचा पगारसुद्धा अदा केला. कामगारांमध्ये पगारवाढीच्या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे.
यानिमित्ताने आमदार राजू आवळे यांचा कामगार संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रोडक्शन मॅनेजर संतोष भोसले, एच. आर. मॅनेजर गजानन हर्षे, संघटनेचे उपाध्यक्ष सचिन खाडे, सचिव आदिल मुल्ला, अनिल सावंत, अनिल शिंदे, अझहर मुल्लाणी, राजाराम कांबळे, प्रकाश जाधव, संजय चाळके, संदीप पाटील, दीपक चौगुले, राजकिशोर खांबे उपस्थित होते.
फोटो ओळी : कामगार संघटनेच्यावतीने आमदार आवळे यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अझहर मुल्लाणी, प्रकाश जाधव, आदिल मुल्ला, सचिन खाडे, संतोष भोसले, गजानन हर्षे उपस्थित होते.
१३ आवळे मील