घन:शाम कुंभार : यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथील विद्यामंदिर क्रमांक दोनच्या इमारतीत जिल्ह्याचे महात्म्य, संस्कृती, परंपरा, इतिहासाच्या झालेल्या रेखाटनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने चित्तर कथा शाळेच्या भिंतीवर साकारून शिक्षकांनी लॉकडाऊनचा सदुपयोग केला आहे. जांभळी (ता. शिरोळ) येथील विद्यामंदिर क्रमांक दोनच्या वर्गखोल्या मोडकळीस आल्याने ते वर्ग हनुमान मंदिर व संस्कृती सभागृहामध्ये भरत होते. सर्व शिक्षा अभियानातून एका खोली व तीन खोल्या जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या जिल्हा नियोजन फंडातून निर्माण झाल्या व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या कार्यालय बांधकामाचा भार पेलला. ही इमारत रंगरंगोटी व यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने घेतल्याने त्यांनी केलेला प्रयत्न व त्यांना मिळालेल्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेच्या भिंतींना रंग लागला आणि भिंती बोलू लागल्या. त्या जिल्ह्यातील जागतिक पातळीवर महत्त्व सिद्ध केलेल्या चित्तर कथा भिंतीवर साकारल्या. भिंतींवर राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या कर्तृत्ववान व्यक्ती, राधानगरी धरण, रंकाळा तलाव, पंचगंगा नदी घाट ही नैसर्गिक वैशिष्ट्ये, दूध कट्टा, चित्रनगरी, कोल्हापुरी चप्पल, गुऱ्हाळ घरे, शिवाजी विद्यापीठ, खासबाग मैदान, न्यू पॅलेस, भवानी मंडप, पन्हाळगड, वेडात मराठे वीर दौडले सात हा ऐतिहासिक ठेवा जोतिबा मंदिर, अंबाबाई मंदिर ही पवित्र धार्मिक स्थळे यासह शैक्षणिक अभ्यासक्रमांची चित्रे रेखाटली आहेत.
यासाठी मुख्याध्यापक अमर दुधाळे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह, गटशिक्षण अधिकारी दीपक कामत, विस्तार अधिकारी आर. डी. काळगे, आण्णा मुंडे, दत्तात्रय जाधवर, विश्वास मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोट - दृश्य माध्यमातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांना लवकर आत्मसात होते. या अनुभवातून पहिली ते चौथी विद्यार्थ्यांची गुणवत्ता बौद्धिक, मानसिक व शारीरिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावी, यासाठी या बोलक्या भिंती तयार केल्या आहेत.
- अमर दुधाळे, मुख्याध्यापक
फोटो - १५०७२०२१-जेएवाय-०२, ०३ फोटो ओळ - जांभळी (ता. शिरोळ) येथे विद्यामंदिर क्रमांक दोनमध्ये भिंतीवर जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित करणारी चित्रे रेखाटली आहेत. (छाया-घन:शाम कुंभार, यड्राव)