नांदणी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी पॅनेलच्या विरुध्द सर्वपक्ष एकवटल्याने येथील निवडणूक अटीतटीची होत आहे. स्वाभिमानीने ग्रामविकासाची कामे पुढे नेण्याचा, तर महाविकास आघाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय निधी आणण्याचे ध्येय ठेवून मतदारांपुढे चालली आहे.
ग्रामपंचायतीमध्ये स्वाभिमानीची गेली पाच वर्षे सत्ता होती. त्यांनी गावामध्ये मोफत शुध्द पाणी, घंटागाडी, शववाहिका यासह नगरपालिकेला असणाऱ्या विविध सोयी-सुविधा ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून आपला कार्यकाल चांगला राबविला आहे. नांदणीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणा-या स्वाभिमानी को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या उभारणीकरिता ग्रामपंचायतीने सहकार्य दिल्याने गावातील बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधीसह उद्योगाच्या उभारणीनंतर ग्रामपंचायतीस कराच्या रूपाने उत्पन्न निर्माण होणार आहे. यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधीत्वाची संधी निर्माण केली असल्याचे पॅनेलप्रमुख सागर शंभूशेटे यांनी सांगितले. त्यांच्यासह उपसरपंच मायगोंड पाटील, युनूस पटेल, राजगोंडा पाटील, पापालाल शेख, बाळासाहेब कांबळे, तानाजी गरड हे या पॅनेलचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
स्वाभिमानी संघटनेच्या विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व इतर संघटना एकत्र येऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीतजास्त शासनाकडून निधी प्राप्त करुन गावचा विकास करण्याची संधी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व खासदार धैर्यशील माने यांच्यामुळे आली आहे. याचा गावच्या हितासाठी वापर करून घेण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत, असे महाविकास आघाडीचे संजय बोरगावे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत संजय बुबणे, महेश परीट, राजेश शंभूशेटे, अशोक माळी, प्रकाश लठ्ठे हे आघाडीचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
* एकूण प्रभाग – सहा
* एकूण सदस्य संख्या – सतरा - नऊ महिला व आठ पुरुष
* पुरुष मतदार – 6228, स्त्री मतदार – 5830 एकूण मतदार – 12058