'महाविकास आघाडीचं १५० जागांवर एकमत'; सतेज पाटील यांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:18 IST2024-09-26T15:12:36+5:302024-09-26T15:18:07+5:30
Maharashtra Politics : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत.

'महाविकास आघाडीचं १५० जागांवर एकमत'; सतेज पाटील यांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं भाष्य
Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. दरम्यान, आता यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगितले असून १५० जागांवर एकमत झाल्याचेही पाटील म्हणाले.
आमदार सतेज पाटील यांनी आज एबीपी माझा वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला समोर जात आहे. तिनही पक्ष मिळून आता १५० जागांवर एकमत झाले आहे. आता राहिलेल्या जागांवर ३० आणि १ तारखेला एकमत होईल. चांगलं सरकार यावं ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचं यावं, ते करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असंही आमदार सतेज पाटील म्हणाले.
Defamation case: "विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले?
"महाविकास आघाडी ही मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रातील जनतेत काम करणार आहे. आमच्यात मोठा, बारका हा वाद न करता आम्ही काम करणार आहे. मागच्यावेळी एक वेगळी परिस्थिती होती तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिले. आता आमच्यात मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही वाद नाही. महाविकास आघाडी तुम्हाला कोल्हापुरात स्टॅॉग दिसेल, तसंच राज्यातही दिसेल, असा विश्वासही सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीची ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबरला जागा वाटपासाठी बैठक
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तेव्हा घटक पक्षातील कोणी विधानसभेच्या कुठल्याही जागेवर दावा केला, तरी याचा अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांच्या एकत्रित होणाऱ्या बैठकीनंतरच जाहीर केला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. सावरकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेआधी पवार यांनी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, उमेदवारीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. परंतु हा निर्णय एका पक्षाचा राहिलेला नाही. तो महाविकास आघाडीचा निर्णय असून तो एकत्रित घेतला जाणार आहे. त्यामुळे यासंदर्भातील आता होणारे दावे निरर्थक आहेत. जर का कोणी उमेदवारीचा आताच दावा करत असेल, तर त्यांच्या बाबतीत 'बाजार तुरी आणि कोण कोणाला मारी', असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल, असे स्पष्ट केले.