नुकसान भरपाई मिळेना शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन चेष्टा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : पूरग्रस्तांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. घराची पडझड, व्यापारी, उद्योजक यांच्यासह शेतकऱ्यांना अद्याप काहीच नुकसान भरपाई मिळालेली नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. त्यात शेतकऱ्यांना प्रति गुंठा १३२ रुपयांची मदत म्हणजे त्यांची चेष्टा आहे. एकूणच महापुराच्या आपत्तीत शासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे प्रचंड आक्रोश व चीड निर्माण झाली आहे, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार बैठकीत केली.
मतदारसंघातील ग्रामीण भागात ७६ लाख ८० हजार रुपये, तर शहरी भागात एक कोटी २५ लाख ४० हजार रुपये इतकीच रक्कम आजतागायत पूरग्रस्तांना वाटप केली गेली आहे. उर्वरितांना अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. २०१९ साली महापूर असताना रोख पाच हजार रुपये आणि नंतर खात्यावर पाच हजार रुपये ग्रामीण व दहा हजार रुपये शहरी अशी तत्काळ मदत दिली होती. शेतकऱ्यांनाही वेळेत व योग्य मदत दिली गेली होती. आता तुटपुंजी मदत देऊन चेष्टा करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे.
दरम्यान, यंत्रमाग उद्योगासाठीही केवळ घोषणाबाजी केली. दोन वर्षे उलटली तरी आजतागायत त्याची अंमलबजावणी केली नाही. यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार आहे. तसेच गतवर्षी लॉकडाऊनमुळे समान हप्ते करून वीज बिले स्वीकारली होती. त्याचा मार्च २०२१ पर्यंत कारखानदार व उद्योजकांनी लाभ घेतला. परंतु यंदा मार्चनंतर पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागल्याने उद्योजकांवर तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. थकबाकी वाढल्याने वीज जोडणी तोडण्याची कारवाई सुरू झाली आहे. सरकारने समान हप्ते करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.