हातकणंगले: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीने ७, शिवसेना आणि जनसुराज्यने प्रत्येकी ३, सर्वपक्षीय आघाडीने ३ तर आवाडे समर्थक ताराराणी आघाडीने ३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. सर्वात मोठ्या कबनूर ग्रामपंचायतीची सत्ता भाजपा-पी.एम. पाटील स्थानिक आघाडीने काबीज केली.
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता कायम राखली आहे. तर ८ ग्रामपंचायतींमध्ये सातांतर झाले आहे. सर्वपक्षीय आघाडी तीन ग्रामपंचायतींमध्ये यशस्वी झाली आहे.
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये तासगाव, किणी आणि हालोंडी येथे बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. तासगाव सर्व जागा बिनविरोध झाल्या. किणी येथे १० जागा बिनविरोध तर हालोंडीमध्ये ९ पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या. अपक्षांमुळे किणीच्या ७ जागांची आणि हालोडींच्या ४ जागाची निवडणूक झाली. या दोन्ही गावामध्ये सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार विजयी झाले. किणीमध्ये एकमेव अपक्षाने बाजी मारली.
जनसुराज्यने पाडळी, मनपाडळे, आणि वाठार तर्फ वडगाव या तीन ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. पाडळी आणि वाठार तर्फ वडगावमध्ये सातांतर झाले. मनपाडळेमध्ये सत्ताधारी कायम राहिले.
शिवसेनेने मिणचे, बिरदेववाडी आणि माणगांववाडी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे. बिरदेववाडीची गेली अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत शिवसेनेने प्रथमच भगव फडकवला आहे. जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी मिणचेमध्ये पुन्हा सत्ता मिळवली असली तरी त्यांच्या पॅनलच्या सारिका अनिल जाधव यांचा धक्कादायक पराभवाने विजयावर पाणी फिरले.
...............
महाविकास आघाडीचा पॅटर्न
महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर एकत्र येत आघाड्या केल्या होत्या. या महाविकास आघाडीने वाठारतर्फे उदगाव, तिळवणी, कुंभोज, दुर्गेवाडी, लाटवडे, नेज, जंगमवाडी, रुई या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.
...............
माणगाव, चंदूरमध्ये आवाडे समर्थक विजयी
आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाचे समर्थक माणगांवचे राजू मगदुम यांनी १७ पैकी १३ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. चंदूरमध्ये आवाडे समर्थक माजी सभापती महेश पाटील यांनी १७ पैकी १४ जागा जिंकून या गावामध्ये सत्तांतर घडवून आणले. तालुक्यातील सर्वात मोठ्या कबनूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपा आणि पंचगंगा साखर कारखाना चेअरमन पी.एम. पाटील यांच्या आघाडीने १७ पैकी १० जागा जिंकून सत्ता कायम राखली. येथे ताराराणी आघाडीने ७ जागा जिंकल्या.