लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुणे मतदारसंघ काहींनी आपली मक्तेदारी समजली होती; मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून विजय खेचून आणला. या एकजुटीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी अधिक भक्कम झाल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पुणे पदवीधरचे नूतन आमदार अरुण लाड व ‘शिक्षक’चे आमदार जयंत आसगावकर यांच्या शुक्रवारी महासैनिक दरबार येथे आयोजित सत्कार समारंभ व कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, आम्ही सत्तेवर येऊन वर्ष झाले असले तरी त्यातील सहा महिने कोरोनामध्ये गेल्याने कामे करता आली नाहीत. ही वस्तुस्थिती असली तरी या निकालातून जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास कमी झाला नाही. तीन पक्षांचा जगन्नाथाचा रथ आहे. हा रथ असाच ओढत न्या. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल गेंड्यांच्या कातडीचे केंद्र सरकार घेत नाही. उलट आंदोलनाला चीन, पाकिस्तानशी जोडणाऱ्यांना भुईसपाट करा, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, या निवडणुकीत पहिल्या फेरीतच विजयी होऊ, अशा अनेकांनी वल्गना केल्या. जणू काही निकाल यांच्या खिशात, अशी काहींची भाषा होती. मात्र लोकभावना कोणाच्या बाजूने होती, उद्रेक काय असतो, हे पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, पुणे विभागातील शिक्षकांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून प्रश्न मार्गी लावू. शपथ घेतल्यानंतर लगेचच शिक्षकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू केला. शिक्षणक्षेत्राला अभिमान वाटेल असे काम करू. आमदार अरुण लाड म्हणाले, विरोधकांनी अनेक क्लृप्त्या केल्या, माझ्यासारखे नाव असणारा डमी उमेदवार उभा केला. मात्र पुणे विभागातील स्वाभिमानी पदवीधरांनी डाव हाणून पाडला. आमच्यावर मोठी जबाबदारी आली असून मंत्री मुश्रीफ व सतेज पाटील यांनी आम्हाला ताकद द्यावी आणि प्रश्न मार्गी लावावेत. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, संजय पवार, विजय देवणे, भरत रसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनिल घाटगे यांनी आभार मानले. आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार दिनकरराव जाधव, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, बजरंग पाटील, निलोफर आजरेकर, दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे, सुरेश कुराडे, बाबासाहेब देवकर, आदी उपस्थित होते.
आसगावकर यांच्याबद्दल धाकधुक
जयंत आसगावकर यांच्या विजयाबद्दल काहीसी धाकधुक होती. निकालादिवशी ४८ तास झोपलो नव्हतो. पसंती क्रमांकामुळे भीती होती. दर अर्ध्या तासाला आपण मतमोजणी केंद्रावरून माहिती घेत होतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
सत्कारासाठी पन्नास फुटी तिरंगी हार
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर हा पहिलाच विजयी होता. त्यात भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून दोन्ही विजय खेचून आणल्याने आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता. त्यांनी आसगावकर व लाड यांचा सत्कार ५० फूट लांबीचा तिरंगी हार घालून केला.
- राजाराम लोंढे