ज्योती पाटील
पाचगाव : राज्य सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित असले तरी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६०, जवाहरनगर या प्रभागात मात्र महाविकास आघाडीतील हे तिन्ही पक्ष आमने-सामने येणार आहेत. प्रभाग क्रमांक ६० हा यंदा सर्वसाधारण महिला या वर्गासाठी आरक्षित झाल्याने या प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात अनेकांनी उमेदवारीसाठी आतापासून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे इच्छुक पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास अनेकांनी बंडखोरी करुन लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बंडोबांना शांत करण्याचे आव्हानही सर्वच पक्षांसमोर असणार आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या प्रभागात मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे. दीड हजारांपेक्षा जास्त मुस्लिम समाजाचे मतदान असल्याने येथील निकालात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. २०१५ मध्ये प्रभाग फेररचनेमध्ये बराच बदल होऊन नेहरूनगरमधील काही भाग व जवाहर नगरमधील काही भाग मिळून प्रभाग क्र ६० उदयास आला. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या भूपाल शेटे यांनी राष्ट्रवादीच्या सुहास सोरटे यांचा पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी व शिवसेनेनेही चांगली मते घेतली होती. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने येथून निवडणूक लढवण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून कमल सोनवणे इच्छुक आहेत. सना शादाब अत्तार, शिरीन फारूक पटवेगर, सुमैय्या फिरोज मकनदार या महिलांनी या प्रभागातून तयारी चालविली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी नाही मिळाली तर यातील अनेक इच्छुकांनी हातात शिवबंधन बांधण्याची तयारी चालविली आहे.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते: भूपाल शेटे : ( काँग्रेस) १३४२,
सुहास सोरटे : (राष्ट्रवादी) ८२२,
अरुण सोनवणे : (शिवसेना) ७०३,
नंदकुमार गुर्जर : (ताराराणी) २४३.
कोट : गेल्या पाच वर्षात या प्रभागात सात ते आठ कोटी रुपयांची अनेक विकासकामे केली असून भागातील अनेक समस्या सोडवल्या आहेत. यामध्ये सुसज्ज हॉल,व्यायामशाळा,कूपनलिका, एल इ डी, हायमॅक्स दिवे,रस्त्याच्या बाजूला पेव्हींग ब्लॉक्स,कोंडळामुक्त प्रभाग, रस्ते,गटर्स,विरंगुळा केंद्र,गार्डन,ड्रेनेज लाईन अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत. पालकमंत्री सतेज पाटील जो उमेदवार देतील त्यांना निवडून आणू.
भूपाल शेटे, विद्यमान नगरसेवक
सोडवलेले प्रश्न: महिला व मुलींसाठी शिक्षणासाठी दुमजली हॉलची उभारणी. कोंडळामुक्त प्रभाग,
व्यायाम शाळा,
अंतर्गत व मुख्य रस्ते,
विरंगुळा केंद्र,
प्रभागातील गटर्स,
पाण्याच्या पाईपलाईन,
ड्रेनेज लाईन,
गार्डन, हायमॅक्स दिवे.
प्रभागातील समस्या
:
प्रभागात काही समस्या असून त्यापैकी
अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो.
अनेक ठिकाणचा ओपन स्पेस अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत.
कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी वेळेवर मिळत नाही.
काही वेळेला वेळेत स्वच्छता होत नसल्याने कचरा रस्त्यावर विखुरला जातो.