दत्तात्रय पाटील ।म्हाकवे : सरकार कोणतेही आलं तरी प्रशासनाचा भोंगळ कारभार पाचवीलाच पूजलेला असतो. त्याचा फटका कसा बसतो याचा अनुभव गलगले (ता. कागल) येथील शेतकरी आप्पासाहेब हरी पडळकर यांना आला. विहिरीवर वीज जोडणी नसताना त्यांना बिल मिळाले आहे.
चार वर्र्षांपासून आप्पासाहेब पडळकर आपल्या विहिरीवर वीज कनेक्शन मिळावे यासाठी वारंवार मुरगूड कार्यालयासह स्थानिक वीज वितरण कर्मचाºयांकडे हेलपाटे मारत होते. मात्र, वीज जोडणी लांबच, त्याऐवजी त्यांच्या हातात ९९० रुपयांचे विजेचे बिलच पडले. बिलाची मुदत ८ डिसेंबर असून, दि. ९ डिसेंबरला बिल मिळाले आहे. त्यामुळे वीज वितरणच्या या गलथान, डोळेझाक ‘महा’प्रतापाबाबत संताप व्यक्त होत आहे.
गलगले येथील गावच्या पूर्वबाजूला गट क्रमांक ८३ (अ /ब) मध्ये पडळकर यांची दोन एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी २००२ मध्ये विहिरीची खोदाई केली जवळपास विद्युत पोल नसल्यामुळे त्यांनी महावितरणकडे विजेची मागणी केलेली नव्हती. गेल्या चार-पाच वर्षांत या विहिरीच्या जवळपास विद्युत खांब बसविण्यात आले. त्यामुळे पडळकर यांच्याही अपेक्षा उंचावल्या. त्यांनी महावितरणकडे विजेच्या मागणीसाठी सन २०१५ मध्ये अर्ज केला; परंतु पडळकर यांच्या विहिरीपासून दोन ते तीन विद्युत पोलची गरज होती. हे पोल पडळकर यांनी बसवावेत, अशी महावितरणची अपेक्षा होती; परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पडळकर यांनी हे पोल बसविलेले नाहीत.मागणीनुसार महावितरणने पडळकर यांना फेब्रुवारी २०१५ मध्ये ५ एचपीचे वीज कनेक्शन मंजूर करून डिपॉझिट भरण्याचे लेखी कळविले. त्यानुसार त्यांनी ७ मार्च २०१५ रोजी ६ हजार २०० इतकी डिपॉझिट रक्कम भरून पावती घेतली आहे. मात्र, वीज जोडणी दिली नाही. तेव्हापासून अद्याप वीजजोडणीची प्रतीक्षाच आहे.मग, मिटर फिरले तरी कुठे?पडळकर यांनी ४६५ युनिटचा वापर केला असून, त्यांना ९९० रुपये बिल आले आहे. मात्र, त्यांच्या विहिरीवर वीज कनेक्शनची जोडणी नसल्याने मीटरही नाही. तरीही मीटरचे रीडिंग पडळकर यांच्या नावे पडले आहे. त्यामुळे मीटरचे ‘चक्र’ नेमके कुठे फिरले असा सवाल उपस्थित होत आहे.
निष्कारण मनस्तापपडळकर सध्या शेतीला इंजिनने पाणी देत आहेत; पण डिझेल, इंजिन दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे वीज कनेक्शनची मागणी केली आहे. परंतु, ‘महावितरण’ने आमची ससेहोलपटच केली असून, बिल पाठवून मनस्ताप दिला असल्याची प्रतिक्रिया पडळकर कुटुंबियांनी ‘लोकमत’कडे दिली.