समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये २२ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत ‘महावाचन उत्सव २०२४’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी याबाबत शासन आदेश काढला आहे.वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे गतवर्षी रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये ६६ हजार शाळांमधील ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याच संस्थेसोबत आता हा उपक्रम यंदाही राबविण्यात येणार आहे. इयत्ता ३ री ते ५ वी, ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी अशा इयत्तानिहायची वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन आवश्यक असून, यामुळे अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि सध्या वाचनसंस्कृतीला बळ देण्याची गरज ओळखून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्यिकाचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्राचे वाचन करतील. वाचलेल्या पुस्तकावर विचार करून त्यावर १५० ते २०० शब्दांत त्यावर मत व्यक्त करून ते महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील, तसेच पुस्तकाच्या सारांशाचा एक मिनिटाचा व्हिडीओही अपलाेड केला जाईल. जिल्हा आणि तालुका स्तरावर ग्रंथप्रदर्शने आयोजित केली जातील. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. व्यक्त केलेल्या मतांच्या आधारे प्रत्येक स्तरावर पहिल्या तीन विद्यार्थ्यांचीही निवड करण्यात येणार आहे.
उद्दिष्टे
- वाचन संस्कृतीला प्रोत्साहन
- विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे
- मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे
- दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे
- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे
- विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे