कोल्हापूर : भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली तर ‘जनसुराज्य’, ‘शिंदेसेना’ व ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे उमेदवार निश्चित असल्याने ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस उजाडला तरी अद्याप महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून घोळ सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली असून, त्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.गेली महिना-दीड महिना महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र, अद्याप गुंता सुटलेला दिसत नाही. त्यात भाजपने पहिल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना प्रचाराला लावले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना दोन जागा मिळाल्या असून, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून अमल महाडिक, ‘इचलकरंजी’तून राहुल आवाडे यांचे नाव जाहीर केले. महायुतीमध्ये उर्वरित आठ जागांचे वाटप निश्चित झाले आहे. त्यामुळे तेथील इच्छुक प्रचाराला लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये मात्र, जागावाटपांचा तिढा कायम आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज, मंगळवारपासून सुरुवात होत आहे. तरीही जागावाटपावर वाद सुरू असल्याने मतदारसंघात संमभ्रावस्था आहे. साेमवारी उमेदवारी जाहीर होतील, अशी अपेक्षा होती; पण तसे न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
‘उत्तर’मधून सरप्रायजिंग चेहरा कोण?‘कोल्हापूर उत्तर’मधून काँग्रेसकडून अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. डझनभर इच्छुक असले तरी आमदार सतेज पाटील यांनी अद्याप पत्ते खोळलेले नाहीत. मागील निवडणुकीप्रमाणे ते यावेळेलाही ‘सरप्रायजिंग चेहरा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र, हा चेहरा काेण? याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.महायुतीचे उमेदवार निश्चित :
- कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक
- इचलकरंजी : राहुल आवाडे
- कागल : हसन मुश्रीफ
- चंदगड : राजेश पाटील
- करवीर : चंद्रदीप नरके
- शाहूवाडी : विनय काेरे
- राधानगरी : प्रकाश आबीटकर
- हातकणंगले : अशोकराव माने
- कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर
- शिरोळ : राजेंद्र पाटील-यड्रावकर