Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलाय. विधानसभेला राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. अशातच महायुतीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा कोल्हापुरातून करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उच्चांकी मतांनी हसन मुश्रीफ यांना विजयी करा असे आवाहन अजित पवार यांनी कागलकरांना केले आहे.
राज्यात महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. कागलमधून विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. हसन मुश्रीफ यांना इतक्या उच्चांकी मतांनी विजयी करा की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.
"आजपर्यंत अनेक चढउतार आले. पण तुम्ही हसन मुश्रीफ यांच्या मागची ताकद कधी कमी केली नाही. या वेळीही हसन मुश्रीफ यांनी तुमच्यासाठी एवढी कामे केलेली आहेत. आता ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आज महाराष्ट्राचे लक्ष कागलच्या निवडणुकीकडे आहे. त्यामुळे तुम्ही असा उच्चांक करुन दाखवा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे. प्रचंड मताधिक्याने महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून द्या," असे अजित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, हसन मुश्रीफ हे सातव्यांदाविधानसभा निवडणूक लढवणार आहेत. या आधी सहापैकी पाच वेळा विधानसभेला त्यांनी निवडणूक जिंकली होती. युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या संजयबाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता.