कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी महायुतीने सोमवारी जाहीर केलेल्या यादीत घटकपक्ष रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) ठेंगा दाखविला आहे़ ‘आरपीआय’ने मागितलेल्या अकरा जागांचा विचार न करता जवाहरनगरची जागा दिली आहे़ त्यामुळे आरपीआय गटांत नाराजीचे वातावरण आहे़आरपीआयने मागितलेल्या जागांचा विचार न केल्यास फरफट सहन करणार नाही, असा इशारा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा़ शहाजी कांबळे व जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दिला आहे़ ‘आरपीआय’ने विचारेमाळ, फिरंगाई, सिद्धार्थनगर, बावडा, टेंबलाई, कणेरकरनगर, जरगनगर, विक्रमनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, राजेंद्रनगर, संभाजीनगर-फिल्टर हाऊसची मागणी केली आहे; पण महायुतीने मंगळवारी जाहीर केलेल्या ४१ प्रभागांतील उमेदवारांत केवळ जवाहरनगर प्रभागात ‘आरपीआय’ला उमेदवारी दिली आहे. पण मागणी न केलेली जागा देण्यामागच्या हेतूबाबत ‘आरपीआय’ कार्यकर्त्यांकडून शंका व्यक्त केली जात आहे़ सोमवारी आरपीआयने शाहू स्मारक भवनात आयोजिलेल्या निर्धार मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांना जागावाटपात नाराज केले जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती़ मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात खासदार रामदास आठवले यांना पालकमंत्र्यांनी ‘आवतन’ही दिले होते़ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने स्थान देण्याचे आश्वासनही दिले होते़; पण प्रत्यक्षात मात्र ४१ पैकी १ जागा दिली. याबाबत पालकमंत्र्यांशी उद्या, गुरुवारी चर्चा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. मंगळवारी रात्री उत्तम कांबळे यांनी पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. कोल्हापुरात आल्यानंतर चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याचे उत्तम कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पक्षाने महायुतीकडे अकरा जागा मागितल्या होत्या़; पण प्रत्यक्षात मात्र पक्षाने मागितलेल्या जागांचा विचार महायुतीने केलेला नाही़ यादी प्रसिद्ध करताना पक्षाला विचारात घेतलेले नाही़ पहिल्या जागावाटपात एकच जागा दिली आहे़ यापूर्वीही पक्षाकडे सत्ता नव्हती़; पण पक्षाने कधीच फरफट सहन केलेली नाही, करणारही नाही़ - प्रा. शहाजी कांबळे
‘आरपीआय’ला जागावाटपात महायुतीचा ठेंगा
By admin | Published: September 30, 2015 1:04 AM