कोल्हापूर, लोकमत न्यूज नेटवर्क: राज्याच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. २४) पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला. कोल्हापूरचेपोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस बलच्या समादेशकपदी बदली झाली. तर बृहन्मुंबईचे पोलिस उपआयुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. पंडित लवकरच कोल्हापूरचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
नूतन पोलिस अधीक्षक पंडित मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे असून, ते २०१३च्या बॅचचे अधिकारी आहेत. नांदेड येथून त्यांच्या पोलिस दलातील सेवेची सुरुवात झाली. त्यानंतर गडचिरोली येथे त्यांनी अपर पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी पार पाडली. नंदुरबार येथे पोलिस अधीक्षक पदावर त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानपदक प्राप्त झाले आहे. सध्या ते बृहन्मुंबई येथे पोलिस उपआयुक्त पदावर कार्यरत होते. कोल्हापुरातील वाढणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे रोखणे, आदी गुन्ह्यांचा गतीने तपास करणे आणि सोशल मीडियातील धार्मिक द्वेषाचे गुन्हे रोखण्यासाठी पंडित यांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांच्या कार्यकालाबद्दल समाधान व्यक्त केले. गेल्या साडेतीन वर्षांत कोरोना काळातील कायदा सुव्यवस्था, पोलिसांचे गृह प्रकल्प, नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव आणि पोलिसांच्या रखडलेल्या पदोन्नतीचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.