कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून इच्छूक उमेदवारांच्या सोमवारी (दि.१४) मुलाखतीदेखील पार पडल्या. यावेळी इच्छूक सहा जणांनी मुलाखती दिल्या. दरम्यान महेश जाधव यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर बुधवारी सायंकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी बॉम्बच फोडला. यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे.
भाजपकडून महेश जाधव हे ही निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. मात्र सत्यजित कदम यांचे नाव सद्या चर्चेत आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. पक्ष निष्ठ कार्यावर आघात का होतोय ? पक्षाबरोबर एकनिष्ठ असणं हा गुन्हा आहे का..? असा सवाल करत त्यांनी आताच पक्षात आलेल्या नेतेमंडळीवर निशाणा साधला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. यात त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेले कार्य व आपल्या एकंदरीत राजकीय वाटचालीचा उल्लेख करत मनातील खदखद मांडली आहे.
आज धनदांडगे आणि बाहेरचे लोक पक्ष विस्तार आणि ताकदीचा अंदाज घेऊन, स्वताचा फायद्यासाठी, संधीसाधूपणा करून पक्षावर उसना हक्क सांगत आहेत. आज प्रसारमाध्यमे आणि सामान्य माणूस हीच चर्चा करतोय की, खरंच भाजपा मध्ये एकनिष्ठ कार्यकर्त्यांत्याला अशा प्रकारे डावलले जात आहे का..शेकडो कार्यकर्ते आणि लोकांना प्रश्न पडलाय " पक्ष निष्ठ कार्यावर असा, आघात का होतोय, पक्षाबरोबर एकनिष्ठ असणं हा गुन्हा आहे का? असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे १९९३ पासून प्रामणिकपणे, स्वताच्या हिम्मतीवर आजपर्यंत जवळपास २८ वर्ष काम करत आलोय. ज्या याकाळात पक्ष विशिष्ट समाजात, भागात मर्यादीत होता, त्याकाळात मी एक बहुजन समाजातील सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक पक्षाबरोबर होते, अशा परिस्थितीमध्ये एक एक कार्यकर्ता जोडत संपुर्ण शहरात पक्ष विस्तार केला. भाजप सरचिटणीस आणि नंतर कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली ती स्व कर्तृत्व आणि मेहनती वर. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत मी अवघ्या दहा दिवसात ४० हजार मतदान घेतले, याकाळात मला अंत्यत तोकडी मदत आणि रसद मिळाली तरी, निव्वळ माझ्या पक्ष कार्याच्या जोरावर मी लढलो. भाजप जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आणि पुणे पदविधर निवडणुक झाली या मध्ये भाजपला लक्षणीय मतदान झाले संपूर्ण शहरातील प्रभागात पक्षाचे चिन्ह पोहचले, शिवाय माझे गुरू आणि सर्वेसर्वा चंद्रकांत पाटील हे पदवीधर मतदार संघातून दोन वेळा निवडून आले.
जिल्हाध्यक्ष असताना २०१० आणि २०१५ साली महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी बैठक झाली, जी न भुतो न भविष्यती" अशी यशस्वीरीत्या पार पडली, याकाळात मला व माझ्या टीमला कठोर परिश्रम घ्यावे लागले, २०१४ नंतर मी पक्षाचे काम जोमाने सुरू ठेवत होतोच अशा काळात मला २०१७ साली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मला पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष पद मिळाले,या संधीचे मी सेवावृत्तीचे साधन मानत समाज व हिंदू धर्म उपयुक्त काम केले. ज्यावेळी मी स्वताचा उल्लेख " मी" असा करतो ते केवळ व्यक्त होण्यासाठी. कारण मी घडताना मला माझे कार्यकर्ते, मित्र, हितचिंतक, परिवार यांचा मोठा हातभार आहे. माझे गुरू चंद्रकांत पाटील यांनी मला घडवले, साथ दिली, मोठं केलं, मुक्त हाताने काम करायला संधी दिली. पण त्यावर आज आघात होतोय का असं वाटतं आहे.