कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचयतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ५१२ ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे.
२९५ सरपंचपद खुले राहिले तर १४० सरपंच हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग तर १४२ सरपंच अनूसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आहे. शिरोळ तालुक्यातील घोसरवाड व करवीर तालुक्यातील भामटे ही गावे सरपंच विनाच राहणार आहे. येथे अनुक्रमे अनूसूचित जमाती व अनूसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने त्रांगडे तयार झाले आहे.ग्रामपंचायत निवडणूकीपुर्वी सरपंच पदाची आरक्षण काढले जाते, मात्र या टप्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्यानंतर हे आरक्षण काढण्यात आले. निकाल लागल्यापासून सरपंच आरक्षण काय पडेल, याचे आडाखे बांधले जात होते. मागील दोन टर्मला कोणते आरक्षण होते, आता काय पडू शकेल, याचा ठोकताळा बांधूनच आरक्षण सोडतीच्या ठिकाणी इच्छूक गेले होते. पहिल्यांदा अनूसूचित जाती, जमाती, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग ही आरक्षण काढण्यात आली.
अनेक गावातील आरक्षणांवर हरकती घेण्यात आल्या, यातून काही अधिकाऱ्यांशी वादही घातले गेले. घोसरवाड, भामटेचे सरपंच पद रिक्त राहणार आहे, सरपंच निवडीनंतर संबधित निवडणूक अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करतील, त्यानंतर आरक्षणात बदल केला जाणार आहे.अनूसूचित जमातीचे पाच सरपंचजिल्ह्यात अनूसूचित जमाती या प्रवर्गातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), घोसरवाड व राजापूरवाडी(ता. शिरोळ), येळाणे (ता. शाहूवाडी), अरळगुंडी( ता. गडहिंग्लज) सरपंच आरक्षण पडले आहे. त्यापैकी घोसरवाड वगळता चार ठिकाणीच सरपंच होणार आहे.