कोल्हापूर : महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर शहरातील चारही पोलीस ठाण्यात सोमवारी महिला राज दिसून आले. पोलीस अधिकाऱ्यांपासून सर्वच पदावर महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार विराजमान होऊन त्यांनीच दिवसभर पोलीस ठाण्याचा कारभार पाहिला.
शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी दिवसभराचा कारभार पाहिला. सोमवारी एक दिवस जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक आरती नणंद्रेकर यांनी घेतली. तर उपनिरीक्षक अंजना फाळके यांनी अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडली, यावेळी ठाणे अंमलदारसह विविध पदांचा कार्यभार १६ महिला अंमलदारांनी घेतला होता. दिवसभर पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज केले. तसेच धाडसाने बोलण्यासाठी पुढे यावे, आत्मसंरक्षण कसे करावे, एकमेकांचे अनुभव आदी गोष्टीवर प्रत्येक महिला अंमलदारांनी आपली मते सर्वांसमोर मांडली. तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यातही उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी प्रभारी पदाची सूत्रे घेऊन इतर महिला अंमलदारांच्या मदतीने दिवसभर पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळला. राजारामपुरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातही महिला राज दिसून आले.
फोटो नं. ०८०३२०२१-कोल-राजवाडा पोलीस स्टेशन (महिला दिन)
ओळ : कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये महिला दिनानिमित्त सर्वच महिला अधिकारी व अंमलदारांनी पोलीस स्टेशनचा एक दिवस कारभार सांभाळला. (छाया: नसीर अत्तार)