आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १५ : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र व इतर राज्यात लाखोंच्या संख्येने शांततेत सुमारे ५८ मुकमोर्चे काढले, पण शासनाने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापूरात बुधवारी (१९ एप्रिल रोजी) महागोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव पाटील आणि उपाध्यक्ष जयेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापूरात यापूर्वी पहिली गोलमेज परिषद झाली, त्यानंतरच आंदोलनाची ठिणगी पडली होती, त्यानंतरच राज्यभर व राज्याच्या बाहेरही सकल मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे शांततेत निघाले. पण शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. मोर्चानंतर राज्यात विवीध निवडणुका लागल्यामुळे सकल मराठा समाज शांत राहीला. त्यासाठी पुन्हा महागोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे.
येत्या बुधवारी कोल्हापूरातील मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे सकाळी १०.३० वाजता ही परिषद होत आहे. या महागोलमेज परिषदेत दिवसभर चर्चा, ठराव, निर्णय, कृती व कार्यक्रम ठरवणे आदी नियोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोन पसरु लागले आहे, तर कोपर्डी सारख्या घटना घडल्याने कोल्हापूरच महागोलमेज परिषदेसाठी निवडल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
मराठा समाजाच्या मागण्याबाबत न्यायालयात सुरु असलेल्या लढ्याबाबत या महागोलमेज परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस, सचिव राजीव लिंग्रस, दिलीप पाटील, दिलीप देसाई, प्रशांत पाटील, माजी महापौर बाजीराव चव्हाण, उमेश पोवार, विजयराव जाधव, उत्तम कोराणे, विक्रांत पोवार, रणजित जाधव, प्रसाद पाटील, नितीन सासने, जयदिप जाधव, किशोर कदम, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
राज्यातून ५०० लोकांना अमंत्रित
महागोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयातील विविध संघटनेचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी व सकल मराठा संघाच्या ४ प्रतिनिधींना खास आमंत्रित केले असून अंदाजे ४०० ते ५०० लोक उपस्थित राहतील. परिषदेतून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. परिषदेतूनच १०० जणांची समिती निर्माण करण्यात येणार आहे. ही समिती शासनस्तरावर दबावगट म्हणून राहणार असून न्यायाबाबत पाठपुरावा करणार आहे.
राणेसह कोणाही राजकिय नेत्यांना अमंत्रण नाही
महागोलमेज परिषदेसाठी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह कोणत्याही राजकिय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
परिषदेतील चर्चेचे मुद्दे -
मराठा समाज विद्यार्थी-विद्यार्थ्याचे फि माफी व शैक्षणिक खर्च शासनाकडे मागणी करण्यासाठी ठराव करणे.
मराठा आरक्षणबाबत न्यायालयात आसणारे दावे याबाबत शासनाची भूमीका याबाबत चर्चा करणे. -
शेतीमालास हमीभाव, कर्जमाफीबाबत चर्चा करुन धोरण ठरवणे तसेच शेतकऱ्यांचे विवीध प्रश्नावर चर्चा करणे. -
मराठा समाजात जनजागृती करणे
सोशल मिडीयाची आचारसंहिता एकमताने ठरविणे,
मराठा समाजातील महिला पुले हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा मागणी नको याबाबत चर्चा करुन ठराव करणे. -
कोपर्डीसारख्या अनेक अत्याचार रोखणयसाठी ठोस निर्णय घेऊन ठराव करणे. -
अॅक्ट्रॉसिटीचे खोटे निर्णय रोखण्यासाठी चर्चा करुन ठोस निर्णय घेणे.