कोल्हापूर : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमीष दाखवून शेतकऱ्यांची सुमारे चार कोटींची फसवणूक करणाऱ्या महारयत अॅग्रो कंपनीची दोन बँक खाती पोलिसांनी सील केली. दोन खात्यांवरील सुमारे एक कोटी रुपांची रक्कम गोठवली असून, अन्य खात्यांचीही तपासणी सुरू आहे.महारयत अॅग्रो कंपनीने सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कराराचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना तीन कोटी ९४ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
शहरातील स्टेशन रोडवरील कंपनीचे कार्यालय सील केली आहेत. शेकडो शेतकऱ्यांशी केलेली करारपत्रके ताब्यात घेतली आहेत. कंपनीची इस्लामपूर येथील खासगी बँकेत खाती आहेत. त्यापैकी एका बँकेतील दोन खात्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्यामध्ये ३० लाख ९५ हजार ५०० रुपये व दुसऱ्या खात्यावर ६३ लाख ५७ हजार रुपयांची रक्कम शिल्लक असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही खाती गोठविली. कंपनीची अन्य बँकांमध्येही खाती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. इस्लामपूरमध्येही महारयत अॅग्रो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने येथील पोलिसांकडूनहा तपास सुरू आहे.