कोल्हापूर : पन्हाळ्याजवळील मसाई पठारावरील ‘पद्मावती’ चित्रपटाचा सेट पेट्रोल बॉम्बने पेटवून देणाºया मुख्य सूत्रधारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बंगलोर येथून शुक्रवारी अटक केली. संशयित राजेश देरन्ना बंगेरा (वय ५०, रा. बंगलोर-कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याने अन्य साथीदारांना घेऊन सेट पेटविण्याचा कट बंगलोरमध्ये रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.मसाई पठारावर ‘पद्मावती’ चित्रपटाचा सेट उभा करण्यात आला होता. राजस्थानबरोबर कोल्हापुरातही या चित्रपटाच्या चित्रीकरणाला विरोध झाल्याने देशात खळबळ उडाली होती. दि. १४ मार्च २०१७ रोजी मध्यरात्री हा सेट अज्ञात जमावाने पेट्रोल बॉम्बने पेटवून दिला होता. तसेच जमावाने जनरेटर व्हॅनसह पाच वाहनांची तोडफोड करत सुरक्षा रक्षकास मारहाण केली. त्यामध्ये राजू, आवदेश व फैयाज हे कामगार जखमी झाले होते.आगीमध्ये ७०० ते ८०० किमती पोशाख, चित्रीकरणाचे साहित्य असे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात अज्ञात १० ते १५ रजपूत लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी निर्माता चेतन भालचंद्र देवळेकर (वय ३४, रा. माहीम, मुंबई) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी सुमारे १५० संशयित लोकांकडे चौकशी केली होती.हा सेट पेटविण्याची रेकी राजेश बंगेरा याने केल्याची प्राथमिक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती. त्यांनी एका पथकाला बंगलोरला पाठवून बंगेराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. त्याच्याकडूनच आणखी संशयितांची नावे निष्पन्न होणार आहेत. पोलीस त्याला सेट पेटविलेल्या घटनास्थळी फिरविणार आहेत.
‘पद्मावती’चा सेट पेटविणाऱ्या मुख्य सूत्रधारास अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 4:53 AM