शिरोळ : शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा काहीसा अनुभव वाहनधारकांना येत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना देखील घडत आहेत. अपघातात एखाद्याचा जीव गेल्यानंतरच नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिरोळ शहरामध्ये नगरपालिका झाल्यापासून विविध विकासकामे सुरु असली तरी शहरातील मुख्य रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच होत आहे. अनेक वर्षापासून वादात सापडलेल्या पोस्ट कार्यालयासमोरील रस्त्याचे मजबुतीकरण होत नसल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पोस्ट कार्यालयासमोरील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गुरुवारी खड्डे चुकविताना अनेक वाहने घसरली. सुदैवाने या घटनेत कोणताही मोठा अपघात झाला नाही. वास्तविक प्रमुख मार्ग असणाऱ्या या रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
फोटो - २३०९२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील मुख्य मार्गावर अशाप्रकारे खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.