कोल्हापूर : महापालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या ५०७ कर्मचाऱ्यांना निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी कायम सेवेत घेतल्याची नियुक्तिपत्रे द्यावीत, असे आदेश मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश देताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून तसेच फटाका फोडून दसरा चौकात आनंदोत्सव साजरा केला.कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील साडेचार हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्यांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना व्यासपीठावर बोलावून सर्वांसमक्ष महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश दिले. यावेळी मंजुलक्ष्मी यांनी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे देण्यात येईल, असे सांगताच मुख्यमंत्री शिंदे यांनी आता प्रस्ताव काही पाठवू नका, सरकारने अध्यादेश काढला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतल्याची नियुक्तिपत्रे देऊन टाका. हा मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे, असे सांगितले.मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश देताच दसरा चौकात सभेस आलेल्या महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पंचवीस तीस वर्षांची प्रतीक्षा संपल्याने या कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले.
कोल्हापूर महापालिकेतील ५०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 1:32 PM