कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे घेतलेले पालकत्व कोणत्याही परिस्थितीत निभावू, जिल्हा परिषद, पाटबंधारे व सिंचन विभागातील प्रलंबित परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. योजना येत्या दोन वर्षांत पूर्ण केली जाईल, असे ठोस आश्वासन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी येथे दिले. महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी व नगरसेवकांसमवेत पाटील यांनी काळम्मावाडी योजना व केशवराव भोसले नाट्यगृहास भेट देऊन कामाचा आढावा घेतला.थेट पाईपलाईन योजनेचा निधी महापालिकेच्या खात्यावर जमा होऊन दीड वर्षे उलटले तरी अद्याप परवानग्यांच्या फेऱ्यातच पाईपलाईनचे काम अडकून पडले आहे तसेच केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार असले तरी पार्किंग व इतर सुविधांसाठी अद्याप १० ते १२ कोटींचा निधी आवश्यक आहे. महापालिकेने राज्य शासनाच्या १० कोटी निधीसह दोन कोटी स्वनिधीतून खर्च केले आहेत. उर्वरित कामांसाठी कमी पडणाऱ्या निधीसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे गटनेता शारंगधर देशमुख व राजेश लाटकर यांनी या भेटीवेळी पाटील यांंना सांगितले.यानंतर हळदी व कुर्डू गावातील सरकारी पाणंद येथे सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या काम, तसेच पुईखडी येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या कामाची पाहणी पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेच्या २.९ किलोमीटरच्या जागेतील पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांना केली. नाट्यगृह व पाईपलाईनच्या कामाबाबत पाटील यांनी समाधान व्यक्त करून वेळेत दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, नगरसेवक अजित पवार, संजय मोहिते, चंद्रकांत घाटगे, लीला धुमाळ, ज्योत्न्सा पवार-मेढे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता मनिष पवार, आदींसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे अंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी ४० कोटी, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी १२ कोटींंचा निधीचा मागणीचा प्रस्ताव नगरसेवकाचे शिष्टमंडळ शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सादर करणार आहेत. हद्दवाढीचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणीही करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहरप्रमुख राजेश लाटकर यांनी माजी मंत्री पाटील यांना सांगितले.
थेट पाईपलाईनचे पालकत्व निभावू
By admin | Published: June 18, 2015 12:24 AM