सांगली : मदनभाऊ पाटील यांच्यावर प्रेम करणाºया कार्यकर्त्यांची संख्या आजही मोठी आहे. त्यामुळे ही ताकद अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी सांगलीत व्यक्त केले.सांगली-माधवनगर रस्त्यावरील मीरा हौसिंग सोसायटीसमोर दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मदन पाटील यांचे व्यक्तिमत्त्व लोकाभिमुख होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा डंका राज्यभरातही वाजत होता. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांना मंत्रिपद दिल्यानंतर पक्षाला ज्या ताकदीची अपेक्षा होती, त्याची पूर्तता त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे अकस्मात जाणे सांगलीसाठीच नव्हे, तर राज्यासाठीही नुकसानकारक ठरले. वेगवेगळ््या पक्षांचे लोक या सोहळ््याला उपस्थित राहतात, यातच त्यांच्या कर्तृत्वाची झलक दिसते. महाराष्टÑात राजकारण करताना वैचारिक मतभेद असणारी नेतेमंडळी कधीही व्यक्तिगत पातळीवर मतभेद मानत नाहीत. हा शिष्टाचार संपूर्ण राज्याला वसंतदादांनी शिकविला.
वसंतदादांच्या पश्चात त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन मदन पाटील यांनी राजकारण केले. खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, माणसांची गर्दी पाहण्यापेक्षा गर्दीतील माणूस शोधण्यास मदनभाऊंनी पसंती दिली. त्यामुळेच ते यशस्वी झाले. विश्वजित कदम म्हणाले की, मदनभाऊंच्या पश्चात त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना सर्व कॉँग्रेस नेते ताकद देतील.सांगली-माधवनगर रस्त्यावरील दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रकाश आवाडे, आ. सतेज पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, प्रतीक पाटील, पृथ्वीराज देशमुख, वैभव नायकवडी, अरुण लाड, आदी उपस्थित होते.