कोल्हापूर: वन विभागातील रोजंदारी मजुरांच्या सेवेचा प्रदीर्घ कालावधी विचारात घेऊन सेवेत कायम करावे अशी मागणी करवीर कामगार संघाने मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही.क्लेमेट बेन यांच्याकडे केली आहे.
महासंघाचे दिलीप पवार, एस.बी.पाटील, शाहीर निकम, सुशीला यादव, विक्रम कदम, रघुनाथ कांबळे, संजय देसाई या शिष्टमंडळाने वनविभागात जाऊन बेन यांची भेट घेऊन निवेदन देत राज्य शासनाच्या २०१२ च्या आदेशानुसार या ४५ जणांना सेवेत कायम करावे अशी आग्रही मागणी केली.
त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, नागपूर यांच्याकडे कोल्हापुरात विभागातील ४५ वनमजूर काम करत होते. २००० मध्ये या डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनचे कामकाज बंद झाले व २००१ मध्ये वनविभागाकडे वर्ग झाले. त्यानंतर मात्र यांना सेवेत ठेवण्यावरुन वनविभागाने हात वर केले. दरम्यान, १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या वनमजुरांना सेवेत कायम करायचे होते, पण वनविभागाने त्यालाही दाद दिली नाही. पाच वर्षांत वनमजुरांनी प्रत्येक वर्षी २४० दिवसांपेक्षा जास्त काम केले असल्याची माहिती वनविभागाने खुद्द न्यायालयात देखील दिली. असे असतानाही आजतागायत त्यांना सेवेत घेतले जात नसल्याने या मजुरांचे मोठे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले. शासन आदेशाचे पालन करणे कायद्याने बंधनकारक असल्याचेही शिष्टमंडळाने वनसंरक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. सेवेत कायम करुन कामगारांना दिल्या जाणाऱ्या लाभांची तत्काळ पूर्तता करावी असेही निवेदनात म्हटले आहे.