खोची : साखर उद्योग अडचणीत असल्याने सर्वच घटकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. ज्यावेळी कारखान्याकडे साखर शिल्लकअसते, त्यावेळी बाजारात साखरेचे दर कमी असतात. कारखान्याने साखर विक्री केली आणि ती व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेली की साखरेचे दर वाढतात, अशी विचित्र स्थिती आहे. तरी सुद्धा कारखाना काटकसरीने चालवून एफआरपीप्रमाणे दर देत आहे. आता मात्र काटकसरीत-काटकसर हाच पर्याय आहे. त्यामुळे दर देणे शक्य होणार आहे. कामगारांची दिवाळी समाधानात जाईल, अशी तरतूद केली जाईल, असे प्रतिपादन शरदचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याचा १४वा बॉयलर प्रदीपन कार्यक्रम राजेंद्र पाटील (यड्रावकर) व त्यांच्या पत्नी सौ. स्वरूपा पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब चौगुले होते. यावेळी ते बोलत होते.राजेंद्र पाटील म्हणाले, ‘चालू हंगामात साडेसहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कमी उत्पादन खर्चात जास्त गाळप करणे ही गरज बनली आहे. वाहतुकीचा तसेच अन्य खर्चही कमी करून काटकसरीतूनच पैसा बचत करण्यात येणार आहे. शेतकरी, सभासद, कामगारांची कारखान्याने सर्व बिले वेळेवर दिली आहेत. याची आठवण ठेवून यापुढेही सहकार्य करावे. उपाध्यक्ष थबा कांबळे, संचालक डी. बी. पिष्टे, संजय नांदणे, अविनाश खंजिरे, रावसाहेब भिलवडे, तात्यासाहेब भोकरे, बबन भंडारी, संजय बोरगावे, आप्पासोा चौगुले, लक्ष्मण चौगुले, गुंडा इरकर, रावसाहेब चौगुले, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष सुनील पाटील, इकबाल बैरागदार, सत्येंद्रराजे निंबाळकर, कार्यकारी संचालक बी. ए. आवटी उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी स्वागत, सुभाषसिंग रजपूत यांनी आभार, तर बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)यशस्वी वाटचाल करूस्थापनेपासून शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर यांची बिले पहिल्यापासून हंगाम संपल्यानंतर पाच ते सहा दिवसांत देण्याची परंपरा बारा वर्षे जोपासली. परंतु, गेल्या वर्षी साखर उद्योगच अडचणीत आल्याने काही शेतकऱ्यांना दोन महिने उशिरा बिले मिळाली. यावेळी जो दर ठरेल तो देताना पैसा उपलब्ध करून सर्र्वांना न्याय देत यशस्वी वाटचाल करू, असे ते म्हणाले.
शरद साखर कारखाना चांगल्या दराची परंपरा कायम राखणार
By admin | Published: October 23, 2015 9:13 PM