कोल्हापूर : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या कालखंडात मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रम कमी होणे, हालचालींचा अभाव आणि बसल्या जागी खाणे यांचा परिणाम आरोग्याच्या समस्या उद्भवण्यात होतो. मुलींमध्ये वजन वाढल्याने समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राखणे हाच या सर्व समस्यांवरचा महत्त्वाचा उपाय आहे, असे प्रतिपादन प्रिस्टीन महिला हॉस्पिटलमधील वंध्यत्व व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. सचिन कुलकर्णी यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. त्यांनी ‘तरुण महिलांमधील प्रजननविषयक सर्वसाधारण समस्या आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्राणिशास्त्र अधिविभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखा विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, जीवनशैलीमध्ये पूरक बदल आणि योग्य आहार व नियमित व्यायामाने वजन कमी करणे या बाबींच्या सहाय्याने महिलांना पॉलिसिस्टीक ओव्हरियन आजारांवर (पीसीओडी) निश्चितपणे मात करता येते. स्त्री-पुरुषांतील शारीरिक व लैंगिक बदल हे नैसर्गिक आहेत. त्याविषयी मनामध्ये विनाकारण गैरसमज आणि संकोच बाळगण्याची अजिबात गरज नाही.
या कार्यक्रमास डॉ. ए. डी. जाधव, एम. व्ही. वाळवेकर, एन. ए. कांबळे, एस. आर. यनकंची, ए. ए. देशमुख, आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. एस. एम. गायकवाड यांनी स्वागत केले. अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. मन्ने यांनी परिचय करून दिला. डॉ. एम. पी. भिलावे यांनी आभार मानले.
अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यकमहिला आणि पुरुष या दोघांमध्येही जीवनशैलीशी निगडित वंध्यत्व समस्या दिसून येतात. त्यावर वैद्यकीय शास्त्राने उपाय शोधून दिले आहेत. पण, केवळ जीवनशैली बदलून सुद्धा त्यावर मात करता येते. एम्ब्रियॉलॉजी या ज्ञानशाखेचा एखादा लघु अभ्यासक्रम विभाग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.