कोल्हापूर : केवळ अहिंसेनेच देशाला स्वातंत्र्य मिळाले हे बिंबविण्याचा प्रयत्न झाला; परंतु अनेकांनी प्राणांची आहुती देऊन सशस्त्र क्रांतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांची नावे कुठेच समोर आली नाहीत. त्यांचेही स्वातंत्र्यातील योगदान हे मोठे आहे, असे प्रतिपादन प्रा. वसंत गिरी (बुलढाणा) यांनी रविवारी येथे केले.प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात ब्र्राह्मण सभा करवीर (मंगलधाम)तर्फे आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत रविवारी ‘वंदे मातरम्... गाथा क्रांतिकारकांची’ या विषयावर ते बोलत होते.प्रा. गिरी यांनी सन १८५६ पासून सन १९४७ पर्यंतच्या सशस्त्र क्रांतीचा पट उलगडला. झाशीची राणी, मंगल पांडे, वासुदेव फडके, वि. दा. सावरकर, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदी क्रांतिवीरांच्या बलिदानाचा धगधगता इतिहास आपल्या शैलीतून मांडल्याने उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.ते पुढे म्हणाले, भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी वेडी झालेली तेव्हाची पिढी आणि आताच्या पिढीकडे पाहिल्यास ती पिढी कशाने वेडी झाली आहे हा प्रश्न निर्माण होतो.स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यागवाद सोडून आता भोगवाद आपल्यात आल्याचे दिसत आहे. ज्यांनी आपले रक्त सांडून भारतमातेला स्वतंत्र केले त्या क्रांतिकारकांचेच विस्मरण आपल्याला झाले आहे. बंकिमचंद्रांनी संस्कृत भाषेतील एक कविता प्रसिद्ध करण्यापूर्वी आपल्या मित्रांना ती ‘आनंदमठ’मध्ये छापावी का न छापावी, असे विचारले. त्यावर मित्रांकडून याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया आल्या; परंतु बंकिमचंद्रांनी त्याकडे दुर्लक्ष करत ही कविता छापली, ती म्हणजे ‘वंदे मातरम्’ होय. पुढे याचे महत्त्व सर्वांना समजले. संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम या वंदे मातरम् गीताने केले.यावेळी जयंत तेंडुलकर, डॉ. उदय कुलकर्णी, प्रकाश सांगलीकर, मेघा जोशी, डॉ. दीपक आंबर्डेकर, महेश धर्माधिकारी, श्रीराम धर्माधिकारी, रामचंद्र टोपकर, रामचंद्र पुरोहित, अॅड. राजेंद्र किंकर, अॅड. दिलीप मुंडरगी, विनोद डिग्रजकर, संतोष कोडोलीकर आदी उपस्थित होते.पद्मजा आपटे यांनी स्वागत केले. प्रशांत कासार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र टोपकर यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यात सशस्त्र क्रांतीचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:29 AM