कोल्हापूर : इतिहास हे एक सत्य असते, त्याचे विश्लेषण वेगळे होवू शकते, मात्र वास्तव नाकारता येत नाही. इतिहासाचा आदर राखा, असे आवाहन ज्येष्ठ अर्थ व कृषितज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी सोमवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर संस्थानचे पाहिले पोलिटिकल सुपरिटेंडेंट मेजर डी. सी. ग्रॅहॅम यांनी संकलित ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आॅफ द प्रिन्सिपलिटी आॅफ कोल्हापूर’ या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर शाहू छत्रपती प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे संचालक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘राजर्षी शाहू साहित्य माला’ अंतर्गत हा सातवा ग्रंथ संपादित केला आहे.थोरात म्हणाले, कोल्हापूरच्या इतिहास मांडणारा मेजर ग्रॅहॅम यांचा अहवाल अदभुत आहे. त्यांनी केलेल्या कोल्हापूरच्या सखोल अभ्यासाचे यातून दर्शन घडते.शाहू छत्रपती म्हणाले, हा ग्रंथ कोल्हापूरच्या सर्व क्षेत्रातील इतिहासाचा आधारस्तंभ, पाया आहे. यात मेजर ग्रॅहॅम यांनी शेती, त्यातील उत्पादने आदींबाबत मांडलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने सध्या कार्यवाही केल्यास शेतकºयांचे विविध प्रश्न मार्गी लागतील. हा ग्रंथ संशोधकांसाठी उपयुक्त ठरणारा आहे.प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या ग्रंथाने कोल्हापूरच्या इतिहासाबाबत संशोधन करणाºयांना मोठे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. विद्यापीठातर्फे हा ग्रंथ आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन दिला जाईल.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी प्रास्ताविकात ग्रंथाचा आढावा घेतला. ते म्हणाले, १८४६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सूचनेनुसार मेजर ग्रॅहॅम यांनी कोल्हापूरबाबतच्या माहितीचे संकलन सुरू केले. याबाबत त्यांनी सात वर्षे काम करुन ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आॅफ द प्रिन्सिपलिटी आॅफ कोल्हापूर’ अहवाल तयार केला.
१८५४ मध्ये त्याचे प्रकाशन झाले. दीडशे वर्षे हा ग्रंथ अप्राप्त होता. मूळ ग्रंथ मिळवून शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्याचे पुर्नप्रकाशन केले आहे. कोल्हापूरच्या आधुनिक इतिहासाची सुरुवात मेजर ग्रॅहॅम यांच्या या ग्रंथापासून होते. १९ व्या शतकातील लोकजीवनाचे प्रतिबिंब यातून उमटते.या कार्यक्रमास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, ‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, वसुधा पवार, लीला पाटील, माजी प्राचार्य य. ना. कदम, सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, अरुण भोसले, अवनिश पाटील, टी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.ग्रॅहॅम याच्या अहवालात ‘अंबाबाई’ असा उल्लेखअंबाबाई की, महालक्ष्मी यावरुन गेल्या दोन वर्षांत कोल्हापूरचे समाजकारण गढूळ झाले आहे. दीडशे वर्षांपूर्वी मेजर ग्रॅहॅम याने त्याच्या अहवालात तीन ते चारवेळा अंबाबाई असा, तर काही ठिकाणी महालक्ष्मी उर्फ अंबाबाई असा उल्लेख केला आहे. त्यामुळे साहजिकच यापूर्वी देखील अंबाबाई हे नाव रुढ असण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक पवार यांनी यावेळी सांगितले.
पुर्नमुद्रीत करण्याची विनंती
मराठा इतिहास हा भारतीय इतिहासाचा भाग आहे. या इतिहासाबाबत अमराठी विद्यार्थी, संशोधकांच्या अभ्यास करतात. या मराठा इतिहासाच्या अनुषंगाने संशोधन करुन शिवाजी विद्यापीठाने काही ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मात्र, यातील इंग्रजी भाषेतील ग्रंथ मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांची अडचण होत आहे. ते लक्षात घेवून विद्यापीठाने संबंधित ग्रंथांचे पुर्नमुद्रण करावे अशी विनंती करतो, असे डॉ. थोरात यांनी यावेळी सांगितले.