कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज, मंगळवारी कोल्हापुरातही कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसह स्वाभिमानी शेतकरी संघटना व विविध संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे. तुमचा सातबारा शाबूत राहायचा असेल तर बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आल्याने या बंदला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
बंदमधून ‘अत्यावश्यक सेवा’ वगळण्यात आल्या आहेत. शिवसेना सकाळी ११ वाजता भवानी मंडपातून बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करत शहरातून भगवी रॅली काढणार आहे. बाजार समितीसह, भाजीपाला मार्केट, सराफ बाजार, व्यापारीही व्यवहार बंद ठेवणार आहेत. शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. ग्रामीण भागातही शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये आस्था असल्याने जनजीवन ठप्प होण्याची शक्यता आहे. शेतकरी गेली बारा दिवस कडाक्याच्या थंडीतही आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार नुसता चर्चेचा घोळ घालत असून ताठर भूमिका घेत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते तर आगीत तेल ओतणारी विधाने करत आहेत.
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर काळे झेेंडे लावून निषेध नोंदवा. मोबाईलचे डीपीही काळे लावून ताकद दाखवा
सतेज पाटील
पालकमंत्री कोल्हापूर