कोल्हापूर : रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशासी नाते असते. ते नाते सदैव गोड राखण्यासाठी आणि रिक्षावाल्यांना समाजात सन्मान मिळावा या हेतूने येथील अनाम प्रेम या संस्थेने दोन दिवसाचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. यामध्ये रिक्षाचालकांच्या रिक्षा स्वच्छ करुन देण्यात येणार असून कमीत कमी पाच रिक्षाचालकांचा सन्मानही करण्यात येणार आहे.अनाम प्रेम ही संस्था नेहमी वेगवेगळे आणि अनोखे उपक्रम राबवित असते. यंदा दि. १३ आणि १४ जानेवारीला सक्रांतीनिमित्त अनाम प्रेम संस्थेने रिक्षाचालकांना एकत्र बोलाविले आहे. निवृत्ती चौकात दि. १३ जानेवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्र्यत होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व रिक्षाचालकांच्या रिक्षा संस्था त्यांच्याकडील द्रावणाने स्वच्छ धुवून देणार आहेत.
एरवी रिक्षा धुण्यासाठी तीन बादल्या पाणी लागते, शिवाय काही डाग कायमचे राहतात, परंतु संस्थेकडे असलेल्या द्रावणाने पाव बादलीत रिक्षा चकचकीत करण्यात येणार आहे. हा सारा उपक्रम नि:शुल्क असून या कार्यक्रमासाठी सर्व रिक्षाचालक, संघटना, प्रवाशांनी यावे, असे आवाहन संस्थेतर्फे राहुल ठाकूर यांनी केले आहे. या कार्यक्रमात रिक्षाचालकांसाठी स्पर्धाही घेण्यात येणार आहे.दि. १४ जानेवारी रोजी रिक्षावालकाच्या सन्मानासाठी चालकाच्या आसनामागे सकाळी ६.३0 ते ७.३0 आणि सायंकाळी ३ ते ७ या वेळेत चालकांना प्रवाशांनी सन्मान द्यावा, या आशयाचे स्टीकर लावण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १ या वेळेत दैवज्ञ समाज बोर्डिंग सभागृहात रिक्षाचालकांना तीळगूळ आणि शुभेच्छापत्र देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी कमीत कमी पाच रिक्षाचालकांचा सन्मान करण्यात येणार आहे, तसेच स्पर्धेचे पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे. रिक्षाचालकांच्या परिवारासाठी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धाही होणार आहेत. यावेळी जया जोग यांचे सतारवादन आणि नंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे.