कोल्हापूर : नववर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीनिमित्त पांढरे शुभ्र तिळगूळ, हिरवट-काळी बाजरी, गुलाबी गाजर, काळेभोर तीळ, वाणाच्या वस्तू अशा साहित्याने संक्रांतीची बाजारपेठ सजली आहे. भोगी व संक्रांत यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठीची गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. शनिवारी भोगी असल्याने भाज्यांची मोठी आवक झाली आहे.‘तिळगूळ घ्या गोड बोला, असा संदेश देणाऱ्या मकर संक्रांतीसाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. भोगीला पांढरे तिळ लावून बाजरीची भाकरी, वरणं-वांग्यासह मिक्सभाजी, पालेभाज्यांचा गरगट्टा, राळ्याचा भात, चटण्या हे नैवेद्य दाखविले जाते.
दुसऱ्या दिवशी शेंगदाण्याची पोळी किंवा पुरणाची पोळी केली जाते. सुवाासिनी हंगामात येणारे धान्य, भाज्या, उसाचे तुकडे, गूळ, तीळ, बिबे एका मातीच्या सुगडीत घालून पूजा करतात. सुवासिनींना हळद-कुंकवासह वाणही दिले जाते. त्यामुळे लोटकी खरेदी करण्यासाठी शाहूपुरी, कुंभारवाडा येथे महिलांनी मोठी गर्दी केली आहे.
ही लोटकी दहा रुपयांपासून पुढे आहेत. तसेच तिळगुळाच्या हलव्याचे ढीगच्या ढीग तिळगूळ वड्या, लहान-मोठे तिळगूळ, रेवडी, तिळाचे लाडू विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
वाण खरेदीसंक्रांतीला भेटवस्तू देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यामध्ये विशेष करून आरसा, प्लास्टिकचे डबे, छोट्या वाट्या, चमचे, कुंकवाचा करंडा, बांगड्या, टिकल्यांची पाकिटे व इतर साहित्य अशा वस्तू देऊन हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत वस्तू हातगाडीवर साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत.
काळ्या कपड्यांची क्रेझमकर संक्रांतील काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे महाद्वार, लक्ष्मी रोड, भाऊसिंगजी रोड, लुगडी ओळ येथील दुकानांबाहेर लावलेल्या डिझायनर साड्यांबरोबरच इरकल व गढीवाल, काठापदराच्या साड्या मन आकर्षून घेत आहेत.
हलव्याचे दागिनेया सणाला नवविवाहितेला तिळगुळाचा हार, कर्णफुले, किरीट, बाजूबंद, कमरपट्टा, मंगळसूत्र असेअसे तिळगुळाचे दागिने घातले जातात. त्यात पारंपरिक तिळगुळाचा हार, कर्णफुले, किरीट, बाजूबंद, कमरपट्टा, मंगळसूत्र आदी तयार दागिनेही उपलब्ध आहेत. तसेच लहान मुलांचाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाणं हा विधी केला जातो.