गडहिंग्लज : भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुण आणि गोर-गरीब शाळकरी मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून, हीच खरी देशाची ताकद आहे. या बुद्धिमत्तेला पुरेपूर वाव दिल्यास ज्ञानरचनावादी समाजाची निर्मिती अशक्य नाही. सध्याच्या ज्ञानयुगातील संधी मानून मुलांना ज्ञानी बनवा, देश ज्ञान समृद्ध होईल, असे प्रतिपादन ‘एमकेसीएल’चे संचालक विवेक सावंत यांनी केले.गडहिंग्लज पालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘ज्ञानयुगात भारताची झेप : आव्हाने व संधी’ याविषयावर त्यांनी चौथे पुष्प गुंफले. आदिमकालातील शेतीच्या शोधापासून ते २१ व्या शतकातील महासंगणकाच्या निर्मितीपर्यंतच्या देशातील स्थित्यंतराविषयी त्यांनी सहज आणि सोप्या भाषेत सोदाहरण विवेचन केले. त्यास श्रोत्यांनी विशेष दाद दिली. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील होते.यावेळी सावंत म्हणाले, शेती आणि उद्योगप्रधान व्यवस्थेनंतर माहितीप्रधान व्यवस्थेचा जन्म झाला. माहितीवर प्रक्रिया करून त्यातून संपत्तीची निर्मिती केली जाऊ लागली. त्यातूनच संगणकाचा जन्म झाला. महासंगणकाच्या निर्मितीद्वारे भारताने संपूर्ण विश्वाला आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेची झलक दाखविली आहे.माहितीच्या युगात देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गोर-गरिबांचे प्रश्न यावरही उतारा शोधता येईल. मात्र, त्यासाठी इच्छाशक्ती व प्राथमिकता ठरविण्याची गरज आहे. तसे झाल्यास या प्रश्नांवर आंदोलने करण्याची देखील गरज भासणार नाही. बौद्धिी स्वामित्वाच्या मानधनाचे पैसे आपल्या देशातच राहण्यासाठी अधिकाधिक संशोधनांचे स्वामित्व आपल्याकडे असायला हवे. मात्र, त्यासाठी नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. किंबहुना, त्यास प्रोत्साहन देणाऱ्या नव्या शिक्षण पद्धतीची आज देशाला गरज आहे, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते. नगरसेविका अॅड. नाज खलिफा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजश्री कोले यांनी अतिथी परिचय करून दिला. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका क्रांतीदेवी शिवणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)साने गुुुरुजीलोकशिक्षणव्याख्यानमाला
मुलांना ज्ञानी बनवा, देश ज्ञानाने समृद्ध होईल
By admin | Published: December 23, 2016 12:52 AM