आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.१0 : छोट्या मनाने मोठे राजकारण करता येत नाही. त्यामुळे मोठे मन करा; तरच शहराचा विकास होईल, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रेय घेणाऱ्या नेत्यांना बुधवारी लगावला.
कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्यावतीने मैलखड्डा, जरगनगर रोड, संभाजीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या जैविक खतनिर्मिती पथदर्शी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. पालकमंत्री पुढे म्हणाले, शहरातील कचरा व पाणी प्रश्न डोकेदुखी नसून हे एक उत्पन्न देणारे साधन आहे. घनकचऱ्यापासून ‘एकटी’ संस्थेने उभा केलेला हा प्रकल्पात दोन वॉर्डातील ओला कचरा एकत्रित करून त्यातून विलगीकरण केले जाते. या कचऱ्याचे जैविक खत निर्माण केले जाते. त्यातून परिचर विकास सेविकांना रोजगार मिळत आहे. विशेष म्हणजे येथे तयार होणारे खत आरोग्यास पोषक असे आहे. त्यामुळे हे खत सर्वांनी विकत नेऊन आपल्या शेतात व बगीच्याला वापरावे. यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. सद्य:स्थितीत हा प्रकल्प दोन वॉर्डाकरीता सुरू केला आहे. भविष्यात ८१ वॉर्डातील कचऱ्यासाठी ठिकठिकाणी सुरू करू. याकरिता सर्व नगरसेवकांनी मनापासून कोणताही श्रेयवाद न करता सहभाग घेतल्यास नगरसेवकांचे छायाचित्र असलेले बकेट नागरिकांना देऊ. याकरीता साडेचार लाख बकेट देण्याची शासनाची तयारी आहे. त्यातून ८०० महिलांच्या हाताला काम मिळेल. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. विरोधक म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशा चांगल्या प्रकल्पांना विरोध करू नये. यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांचीही छायाचित्रही अशा बकेटवर छापू, असे सांगितले. त्यामुळे पक्षीय भेदभाव न करता सर्व नगरसेवकांनी शहराला भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे यावे. त्यात अशा प्रकल्पांमध्ये नगरसेवकांनी मॉनिटरिंग करावे. त्यांचाच परिसर स्वच्छ होणार आहे. अशाप्रकारची ८१ वॉर्डातील नगरसेवकांना ‘स्पेशल आॅफर’ आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
महापौर म्हणाल्या, वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरणामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. सौंदर्य व आरोग्य अबाधित ठेवायचे असेल तर कचरा व सांडपाणी निर्गत होणे आवश्यक आहे. स्वागत एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले. यावेळी व्यासपीठाखालील शोभीवंत झाडांच्या कुंड्यांना पथदर्शी प्रकल्पात तयार झालेले जैविक खत घालून कार्यक्रमाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने पालकमंत्री पाटील यांनी केले.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, नगरसेविका वृषाली कदम, नगरसेवक किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, डॉ. रेश्मा पवार, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवकांचे प्रबोधन करा नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना त्यांनी शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वीज वितरण कंपनीला विकण्याचा प्रकल्प राबविला. त्यातून आजही वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे नागपूर महापालिकेलाआजही १८ कोटी वार्षिक उत्पन्न मिळत आहे. अशाप्रकारचे प्रकल्प कोल्हापुरातही आपण स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करून ते सुरू करण्याची गळ घालू शकतो. याकरिता महापौर हसिना फरास, स्थायी समिती सभापदी डॉ. संदीप नेजदार व आयुक्तांनी नगरसेवकांची आढावा बैठक घेऊन त्यांचे प्रबोधन करावे. त्यात पक्षीय भेदभाव विसरून शहराच्या विकासासाठी एक त्र यावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.