कोल्हापूर : दु:ख, दैन्य, अन्याय, कमतरता जिथे जिथे आहे, तिथे तिथे आपण पोहोचावे, मदतीचा हात द्यावा, असे प्रत्येकााला वाटते; पण कोठून आणि कशी सुरुवात करायची हा प्रश्न पडतो. एकटी संस्था त्यासाठीच काम करीत आहे. रस्त्यावरील फिरस्ती, मनोरुग्ण, बेघर महिला-पुरुष तसेच कचरा वेचक महिला व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे. त्यामुळे माणुसकी जपण्यासाठी हवी आहे तुमची साथ. त्यासाठी दर महिन्याची रद्दी संस्थेला ‘तिजोरी भेट’ म्हणून द्या, असे आवाहन एकटी संस्थेतर्फे केले आहे.संस्थेमार्फत बेघरांसाठी कोल्हापूर शहरात तीन निवारागृहे कार्यरत आहेत. या निवारागृहांमार्फत अनेक बेघरांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. कचरा वेचक महिला व बेघर स्त्री-पुरुषांना रोजगार मिळावा यासाठी संस्थेने ग्रीन बिझनेसेसची निर्मिती केली आहे. या ग्रीन व्यवसायाच्या माध्यमातून संस्था बेघर व कचरा वेचक महिलांना कागदी व कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्याचे काम करते. या कागदी व कापडी पिशव्या बनविण्याकरिता संस्थेने जुन्या साड्या व रद्दी संकलन उपक्रम सुरू केला आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून रुईकर कॉलनीतील रॉयल रिस्ट्रीट सोसायटीतील कुटुंबे दर महिन्याला ५० ते ६० किलो रद्दी संस्थेस भेट देतात. त्यातून संस्थेने सहा हजारांहून अधिक कागदी पिशव्या तयार करून त्यांची शहरातील मेडिकल दुकानात विक्री केली आहे.
या उपक्रमामुळे प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या वापरण्याची सवय अनेक मेडिकल तसेच फळ विक्रेत्यांना लागली आहे. त्याचा फायदा पर्यावरणाला होत आहे. त्यासाठी आता माणुसकी जपण्यासाठी तुमची साथ हवी आहे, अशी साद एकटी संस्थेतर्फे दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी दर महिन्याची रद्दी संस्थेला ‘तिजोरी भेट’ म्हणून द्यावी, रद्दीसोबत जुन्या साड्या, जुने घरगुती सामान एकटी बेघर निवासरागृह, जुने विचारे विद्यालय, परीख पुलानजीक पुनर्वापरासाठी द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.