इंदुमती सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : नायब तहसीलदारांचा ग्रेड पे ४८०० रुपये झालाच पाहिजे, हम सब एक है, हमारी युनियन हमारी ताकद अशा घोषणा देत सोमवारी नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे दोन तास धरणे आंदोलन केले. पुढील दहा दिवसांत हा निर्णय झाला नाही तर २८ तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाईल, याची आठवण करून देण्यात आली.
नायब तहसीलदारांचे ग्रेड पे वाढवून देण्याच्या राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनाला आठ महिने झाले तरी त्यावर निर्णय झालेला नाही, त्यामुळे नायब तहसीलदारांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. ठरल्यानुसार सोमवारी शासनाला स्मरणपत्र देण्यात आले व २ तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार दिगंबर सानप यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार स्वप्निल पवार यांना शासनाला सादर करावयाच्या स्मरणपत्राचे निवेदन देण्यात आले. पुढील दहा दिवसांत ग्रेड पे वाढवण्याचा निर्णय झाला नाही तर २८ तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी तहसीलदार सरस्वती पाटील, सुनिता नेर्लीकर, प्रज्ञा कांबळे यांच्यासह तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.